पिंपरी: तिळगूळ घ्या गोड गोड बोला, असे म्हणत लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी घरोघरी आणि मंदिरामध्ये जमलेल्या महिलांनी ओवश्याचे वाण देत मकरसंक्रांत साजरी केली. मकर सक्रांतीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये आणि विशेषत: देवीच्या मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती.
नववधूसह महिला पारंपरिक वेशभूषेत मंदिरामध्ये ओवश्यासाठी जमलेल्या दिसून आल्या. महिलांनी सकाळपासून ओवसा पूजनासाठी घराजवळच्या मंदिरामध्ये गर्दी केली होती. मकरसंक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे, जो प्रेम, आपुलकी आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो. या सणाच्या निमित्ताने महिलांनी एकमेकींना ओवसा घेऊन जाण्याची परंपरा आहे. एकमेकींनी पारंपरिक पद्धतीने हळदी - कुंकू लावत ओवश्याचे वाण देत हा दिवस साजरा केला. एवढेच नाही, तर नोकरदार महिलांनी कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच ओवसा पूजन, गोडधोडाचे जेवण करून घराबाहेर पडल्या आणि कामाच्या ठिकाणी ओवश्याचे वाण दिले. बहुतांश महिलांनी मकर संक्रांतीनिमित्त खास काळ्या रंगाच्या पारंपरिक पोशाखात फोटोसेशन करत मित्रमंडळीसोबत संक्रांत साजरी केली.
सकाळपासून सोशल मीडियावर मकर संक्रांतीचे शुभेच्छा संदेश फिरत होते. मकर संक्रातीनिमित्त पतंग उडविण्याची प्रथा आहे. बाजारातही विविध रंगातील आणि आकारातील पतंग विक्रीस होते. या वेळी लहानांसह मोठ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतलाशहरवासीयांनीदेखील घरोघरी भेट देऊन तिळगूळ घ्या गोड बोला म्हणत सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
मकर संक्रांतीनिमित्त पिंपळे गुरवमध्ये मंदिरांत महिलांची गर्दी
मकर संक्रांतीनिमित्त पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर परिसरात मंदिरांमध्ये महिलांनी ओवसा देण्यासाठी गर्दी केली होती. महिलांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण होते. महिलांनी मोठ्या उत्साहात दर्शनासाठी गर्दी केली. वर्षातील पहिला मोठा सण असल्याने देवदर्शन करून वर्षभर सुख-समृद्धी आरोग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यासाठी महिला पहाटेपासूनच मंदिरात दाखल झाल्या.
सुदर्शननगर परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच महिलांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सुवासिनी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मंदिरात उपस्थित राहून विधीपूर्वक पूजा-अर्चा केली. अनेक महिलांनी दर्शन घेत देवाकडे सौभाग्य ऐक्य व आनंदाची प्रार्थना केली. संक्रांतीनिमित्त महिलांनी तिळगूळ वाटप, ओवाळणी आणि हळदी-कुंकू या परंपरागत धार्मिक प्रथा जपल्या. तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला या शुभेच्छांमुळे मंदिर परिसरात आपुलकीचे व आनंदी वातावरण दिसून आले. संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या हळदी-कुंकू समारंभाच्या तयारीसाठीही महिलांनी देवाजवळ संकल्प सोडल्याचे चित्र पाहायला मिळाले.