Gauri Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Gauri Festival: पिंपरी-चिंचवडमध्ये गौरींच्या आगमनाची तयारी; पेणच्या शाडू मातीच्या मुखवट्यांना महिलांची पसंती

चिंचवड, भोसरी, निगडीसह प्रमुख बाजारपेठा सजल्या; गौरींचे मुखवटे, दागिने, साड्या अन्‌ आरास साहित्याची खरेदी जोरात

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच आता त्यापाठोपाठ येणाऱ्या गौरी पूजनाची तयारी शहरात जोरात सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड, भोसरी, निगडी, पिंपळे सौदागर, वाकड या प्रमुख बाजारपेठांमध्ये गौरींचे मुखवटे उपलब्ध झाले असून, महिलांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.

यंदा बाजारात पेण येथून आलेले शाडू मातीचे मुखवटे सर्वात जास्त चर्चेत आहेत. हे मुखवटे पर्यावरणपूरक असून त्यावर हाताने केलेले आकर्षक रंगकाम, सोनेरी नथ, ठसठशीत कुंकू आणि हसरा चेहरा यामुळे महिलांची पहिली पसंती ठरत आहेत. या मुखवट्यांची किंमत आकारानुसार १५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत आहे. तर कमी बजेटमध्ये फायबर आणि पीओपीचे मुखवटे ५०० ते १५०० रुपयांत उपलब्ध आहेत. कोल्हापुरी साडी, नथ आणि ठुशीसह सजवलेल्या गौरींना जास्त मागणी आहे.

केवळ मुखवटेच नाही, तर गौरीसाठी लागणारे दागिने, साड्या, आरास साहित्य, फुलांच्या माळा, रांगोळी यांचीही बाजारात रेलचेल आहे. सध्या बाजारात गौरींच्या कापडी, शाडूच्या, पी.ओ.पीच्या अशा तीन प्रकारच्या मूर्ती उपलब्ध आहेत. अनेक सुबक, विविध आकाराच्या, आखीव रेखीव मुखवटे आणि सजलेल्या गौरी बाजारात प्रत्येकाचे लक्ष वेधत आहेत. स्टॅंडही आकारानुसार उपलब्ध आहे. त्यांचीही किंमत ५०० ते १००० रुपये अशी आहे.

गौरींच्या दागिन्यांची रेलचेल

दागिने खरेदी हा तर गौरीच्या खरेदीचा महत्त्वाचा भाग आहे. दागिन्यांमध्ये लक्ष्मीहार, चपलाहार, मोहनमाऴ, ठुशी, बोरमाऴ, राणीहार, मंगऴसूत्र, मोत्यांचे दागिने, नथ, कंबरपट्टा, बांगड्या या दागिन्यांनी गौरींना सजवले जाते. पारंपरिक म्हणून मोत्यांचे दागिनेदेखील आवर्जून वापरतात. तसेच मोहनमाळ, पुतळ्या, बोरमाळ, कोल्हापुरी साज या सगऴ्या दागिन्यांनी सध्या बाजारपेठ सजली आहे.

दागिन्यांमध्ये मोत्यांचे आणि खड्यांचे दागिने असे प्रकार पाहायला मिळतायतं. मुकुटांमध्ये अधिक सुबक आणि नाजूक डिझाईनच्या मुकुटांना अधिक मागणी पाहायला मिळतेयं. मोत्याच्या दागिन्यांच्या किंमतींमध्येही विविधता आहे. चंद्रकोर डोरल, पांढ-या मोत्यांच्या दागिन्यांनादेखील महिलांची पसंती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT