पिंपरी: पिपंरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सोमवार (दि. 15) पासून लागू झाली आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शहरातील तब्बल 4 हजार 819 राजकीय फ्लेक्स, बॅनर्स, किऑक्स, होर्डिंग, झेंडे, फलक हटविण्यात आले आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशांनुसार महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच शासकीय इमारतींच्या परिसरात लावण्यात आलेले अनधिकृत, नियमबाह्य जाहिरात फलक, फ्लेक्स हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. ही कारवाई करताना संबंधित राजकीय पक्ष, इच्छुक, माजी नगरेसवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेला सहकार्य करावे. पुढील काळात कोणत्याही स्वरूपात आचारसंहितेचा भंग होईल, असे साहित्य लावू नये, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त राजेश आगळे यांनी केले आहे.
अनेक भागांत फ्लेक्स, झेंडे कायम
आचारसंहिता लागू झाली तरी, शहरातील काही भागांत राजकीय फ्लेक्स, होर्डिंग, फलक तसेच, झेंडे कायम होते. त्यामुळे शहरात निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष करून सत्ताधारी पक्षाचे फ्लेक्स व झेंड्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
नियमितपणे कारवाई सुरू राहणार
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात कुठेही राजकीय स्वरूपाचे जाहिरात फलक, होर्डिंग, फ्लेक्स राहू नयेत, यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन तातडीने ही कारवाई करण्यात येत आहे. पुढील काळातही यात सातत्य सुरू राहणार आहे, असे उपायुक्त राजेश आगळे यांनी सांगितले.
नियमाचे पालन न केल्यास कारवाई
निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व समतोल राखण्यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रभाव टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाय राबविले असून, सर्वांनी नियमांचे पालन करावे. अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.