

चाकण: चाकण दक्षिण व उत्तर महाळुंगे एमआयडीसी ही 2 नवी पोलिस ठाणी मंजूर झाल्यानंतर तातडीने या नवीन पोलिस ठाण्याचा कारभार सुरू होत आहे. कारण या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
चाकण आणि महाळुंगे पोलिस ठाण्यांचे विभाजन करताना या दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची नव्याने केलेल्या पोलिस ठाण्यांमध्ये ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली असून, नवीन अधिकाऱ्यांना जुन्या पोलिस ठाण्याचे कार्यभार देण्यात आले आहेत.
वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांची महाळुंगे दक्षिण म्हणजेच जुने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांची उत्तर महाळुंगे (नवीन) पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम : उत्तर चाकण (पूर्वीचे) पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळुंके : चाकण दक्षिण (नवीन) पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार तसेच गुन्हेगारीचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चाकण पोलिस ठाणे आणि आळंदी पोलिस ठाण्याचे विभाजन करून ‘चाकण दक्षिण पोलिस ठाणे’, तसेच महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे विभाजन करून ‘उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे’ अशी एकूण दोन नवीन पोलिस ठाणी निर्माण करण्यात आली आहेत.
गृह विभागाने यासंदर्भात 14 डिसेंबर 2025 रोजी शासननिर्णय जारी केला आहे. दोन्ही नवीन पोलिस ठाण्यांसाठी प्रत्येकी चार पोलिस निरीक्षक, सहा सहायक पोलिस निरीक्षक, 13 उपनिरीक्षक, 13 सहायक उपनिरीक्षक, 44 हवालदार, 84 पोलिस शिपाईपदांना दोन टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे.