

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक नऊ वर्षांनंतर होत आहे. त्यासाठी 15 जानेवारी 2026 ला मतदान होत आहे; मात्र शहरातील तब्बल 17 हजार 833 मतदारांना या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. तसेच, त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या अजब नियमामुळे ते मतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यांना शहर विकासाच्या महत्वपूर्ण निर्णयापासून दूर रहावे लागणार आहे.
महापालिकेची मागील निवडणूक फेब्रुवारी 2017 ला झाली. कोरोना महामारी, ओबीसी आरक्षण, प्रभाग सदस्य संख्येत वाढ, न्यायालयाचा हस्तक्षेप आदी विविध कारणांमुळे महापालिका निवडणूक फेब्रुवारी 2022 ला होऊ शकली नाही. त्यामुळे महापालिकेत 12 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. नगरसेवक नसल्याने सर्व कारभार आयुक्तांच्या हातात एकवटला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगास दिले आहेत. त्यानुसार, कामकाज सुरू करण्यात आले. चार सदस्यीय प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडत काढून आरक्षित जागा निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी 1 जुलै 2025 पर्यंतची भारत निवडणूक आयोगाची मतदार यादी महापालिकेस देण्यात आली. ती प्रभागनिहाय फोडून सोमवारी (दि.15) अंतिम करण्यात आली आहे. त्यात सर्वांधिक 75 हजार 105 मतदार रावेत, किवळे मामुर्डी प्रभाग क्रमांक 16 मध्ये आहेत. तर, सर्वांत कमी 33 हजार 33 मतदार थेरगाव, पडवळनगर प्रभाग क्रमांक 23 मध्ये आहेत. एकूण 17 लाख 13 हजार 891 मतदार आहेत. त्यातील 92 हजारांपेक्षा अधिक मतदारांची नावे दुबार आहेत. तर, सुमारे 1 हजार नावे रद्द करण्यात आली आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडून 1 जुलै 2025 ची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे त्यानंतर नोंदणी केलेल्या मतदारांना महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार नाही. त्या मुदतीनंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण 3 हजार 152 मतदारांची भर पडली आहे. चिंचवड मतदारसंघात 6 हजार 863 आणि भोसरी मतदार संघात 7 हजार 818 मतदारांची नोंद झाली आहे. शहरातून एकूण 17 हजार 833 नवीन मतदारांची भर पडली आहे. मात्र, त्यांना महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. तसेच, निवडणूक लढता येणार नाही. लोकशाहीतील पवित्र मतदानाच्या हक्कापासून त्यांना वंचित रहावे लागणार आहे. त्यात महिलांसह पुरुष मतदारांचा समावेश आहे. तसेच, 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची संख्या अधिक आहे. नवमतदार आपल्या जीवनातील पहिल्या मतापासून लांब राहणार असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार महापालिकेचे कामकाज
राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदारसंघाची यादी उपलब्ध करून दिली आहे. ती मतदार यादी 1 जुलै 2025 पर्यंतची आहे. शहरातील 1 ते 32 प्रभागानुसार ती यादी फोडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली. नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी घेऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी (दि.15) प्रभागनिहाय अंंतिम मतदार यादी प्रतिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मतदाराचे नावे वगळणे किंवा स्थलांतरित करण्याचा महापालिकेस अधिकार नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.