

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देत महापालिका पुन्हा काबीज करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर, भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखतीचे सत्र सुरू झाले आहे. अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपाने दंड थोपटले आहेत. त्यांच्या पक्षाच्या काही माजी नगरसेवकांना मुंबई येथे भाजपात प्रवेश करून घेतला जाणार आहे. महायुती फुटल्याने फोडाफोडीचे प्रकार सुरू झाल्याने निवडणुकीचा माहोल तापला आहे.
महापालिका निवडणुकीची घोषणा सोमवार (दि. 15) झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव व सीमा सावळे या दोघींना पक्षात प्रवेश दिला आहे. तसेच, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड. सचिन भोसले, उपशहरप्रमुख नेताजी काशिद, महिला शहर संघटिका रुपाली आल्हाट यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करीत हाती घड्याळ बांधले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुती होणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट करून स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी महायुती फुटीवर शिक्कामोर्तब झाले. त्या फुटीनंतर महायुतीतील राष्ट्रवादीने भाजपा व शिवसेनेचे माजी नगरसेवक फोडत त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. अजित पवारांना शह देण्यासाठी स्थानिक भाजपानेही कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक तसेच, पदाधिकारी भाजपात प्रवेश करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करीत आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचे मुंबई येथे पक्ष प्रवेश घेण्यात येणार आहेत. तसेच, पक्षाकडे विक्रमी 730 इच्छुकांनी अर्ज नेले आहे. त्यांच्या मुलाखती घेण्यास मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
तर, एकनाश शिंदेच्या शिवसेनेकडून रविवार (दि.21) पर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या दिवसापासून मुलाखतीला सुरुवात केली जाणार आहे. भाजपासोबत युती करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचा दावा पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर, मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने भाजपाकडे 15 जागांची मागणी लावून धरली आहे.
दरम्यान, महायुती फुटल्याने मित्रपक्षांतील माजी नगरसेवक तसेच, सक्षम इच्छुक गळ्याला लावून आपल्या पक्षात घेण्याचे सत्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत सुरू राहणार आहे. महापालिका काबीज करण्यासाठी भाजपासह, राष्ट्रवादी काँग्रेस ताकीदने पावले टाकत असल्याचे निवडणुकीचे वातावरण अधिक तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोबत एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्याही झडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.