Pimpri Chinchwad Budget Controversy Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Budget Controversy: पिंपरी-चिंचवड अर्थसंकल्पावरून खडाजंगी; प्रशासनावर गंभीर आरोप

नगरसेवकांची चौकशीची मागणी; सभागृहात गोंधळ, कामकाजाचे ‘लाईव्ह’ प्रक्षेपण प्रथमच

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2026-27 च्या अर्थसंकल्पावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रशासकीय राजवटीतील कारभारावर तोंडसुख घेतले. प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत, प्रभागांतील आवश्यक कामांसाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधीची तरतूद करण्याची मागणी महापौरांसह आयुक्तांकडे करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षपदी महापौर रवी लांडगे होते. प्रशासकीय राजवटीत तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांनी चुकीची कामे करीत मोठ्यां प्रमाणात उधळपट्टी केली आहे. थेट खरेदी, थेट पद्धतीने निविदा राबवून मर्जीतील ठेकेदारांना कामे बहाल करणे. आवश्यकता नसताना खर्चिक कामे करणे, त्यासाठी कर्ज काढणे. या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कारवाई करावी. दायित्व असलेल्या कामांची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी सभागृहातील अनेक नगरसेवकांनी केली.

काम सांगितले की, अधिकारी निधी नसल्याचे कारण पुढे करत आहेत. ते धोरण बंद करा. प्रभागांतील कामे करण्यासाठी पुरेसा निधी द्या. कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी द्या. शहराच्या गरजेच्या कामांना प्राधान्य द्या. बचत आणि काटकरीचे धोरण अंवलबून, आवश्यक कामांना प्राधान्य द्या. जागा ताब्यात घेण्यासाठी नुकसान भरपाई देण्याऐवजी टीडीआर द्या. सक्तीने कर वसुल करताना नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यावर भर द्या, असा सल्ला प्रशासनाला देण्यात आला. शहरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज घोटाळा होत आहे. रॉयल्टी चोरी रोखल्यास महापालिकेस मोठे उत्पन्न मिळेल. शासनाकडून प्रलंबित असलेला शिल्लक निधीसाठी आयुक्तानी ठोस पाठपुरावा करावा, असेही मत अनेकांनी व्यक्त केले.

महापौर, पक्षनेत्यामध्ये नाही ताळमेळ

महापौर रवी लांडगे यांनी भाजपाचे विनोद नढे यांना थोडक्यात मत मांडा. विषयाला धरून बोला, असे सांगत भाषण आटोपते घेण्याची सूचना केली. त्यावर नढे यांनी पक्षनेत्यांनी मला एक तास बोलण्यास सांगितले, असे असल्याचे स्पष्ट केले. त्यावर महपौर व पक्षनेत्यांत ताळमेळ नसल्याचे दिसून आले. नढे यांनी एक नव्हे, तर तब्बल दीड तास बोलत महापालिकेच्या विविध विभागांचे वाभाडे काढत आपले मत मांडले.

सभा कामकाज लाईव्ह करण्यास अखेर सुरुवात

महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाजाचे थेट प्रेक्षपण (लाईव्ह) करण्यात आले. त्यासाठी दोन कॅमेरामन नेमण्यात आले होते. तसेच, सभागृहातील एका स्क्रीनवर अर्थसंकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. थेट प्रेक्षपणामुळे नागरिक तसेच, सामाजिक कार्यकर्त्यांना घरबसल्या आपला नगरसेवक कसे मत मांडत आहे, हे पाहता आले. शहरवासीयांना सभागृहाचे कामकाज कसे चालते, हेदेखील समजले.

बोलू न दिल्याने सभागृहात गोंधळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना बोलू न दिल्याने त्यांनी महापौराच्या आसनासमोर गर्दी केली. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी मध्यस्थी करत सर्वांना बोलू दिले जाईल, असे आश्वासन दिले. त्यात महापौर रवी लांडगे व उपमहापौर शर्मिला बाबर यांनीही सर्वांना बोलू दिले जाईल, असे सांगत नगरसेवकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्वजण आपल्या आसनावर जाऊन बसले. त्यानंतर शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी आपले मत मांडण्यास सुरुवात केली. पुढे सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT