Blind Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchawad Blind Friendly Infrastructure: स्मार्ट सिटी असूनही पिंपरी-चिंचवडमध्ये दृष्टीहिनांसाठी रस्ते अजूनही असुरक्षित

फुटपाथवरील अडथळे, उघडी ड्रेनेज व पोलमुळे दिव्यांगांचे स्वावलंबी जीवन धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: रस्त्यामधील अडथळे पाहता दृष्टीहिनांना रस्त्याने चालताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. स्मार्ट असूनही दिव्यांगाना सुलभ होतील अशाप्रकारे पदपथ आणि इमारती बांधण्यात आलेल्या नाहीत. उघडी ड्रेनेजची झाकणे, पदपथावर लावण्यात आलेले बॅरिगेट्‌‍स व पोल, मध्येच असलेले विजेचे खांब यामुळे दृष्टीहिनांना चालण्यासाठी अडथळाविरहित वातावरण नाही.

शहरात पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर हा स्मार्ट सिटीचा जो भाग आहे. त्या परिसरात फुटपाथ, सायकल ट्रॅक बनविण्यात आलेले आहेत. मात्र, या फुटपाथवर सायकल ट्रॅकवर मोठ्या गाड्या जावून नयेत म्हणून बॅरिगेट्‌‍स व पोल लावले आहेत. ते गुडघ्याच्या उंचीएवढे आहेत की ते दृष्टिहिनांना चालताना पोल जोरात लागतात. शहरात अडथळाविरहीत वातावरण तयार केले जात आहे आणि इथं फुटपाथवर अडथळे लावण्यात आले आहेत. एखादा दिव्यांग व्यक्ती फुटपाथवर चालायला लागला तर त्याला वाटते की गाड्या फुटपाथवर येणार नाहीत. पण प्रत्यक्षात फुटपाथवरुनच गाड्या चालतात. या सर्व गोष्टींमुळे दृष्टिहिनांना बाहेर जाणे फारच कठिण होऊन बसले आहे. शहरात ते निर्धास्तपणे चालू शकत नाही.

वाहने फुटपाथवर येऊ नयेत, यासाठी साधासरळ उपाय म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे हा आहे आणि जो कोणी फुटपाथवर गाडी चालवेल त्याला दंड करण्यात यावा. अशा प्रकारच्या दंडाने वाहतूक विभागाची वसुलीदेखील होईल. याने फुटपाथवर चालणाऱ्या गाड्यांना आळा बसेल.

तुटलेले पदपथ अन्‌‍ ड्रेनेजची झाकणे

पिंपरी बाजारसारख्या ठिकाणी फुटपाथ तुटलेले आहेत. फुटपाथ दुरुस्तीचे काम महापालिकेचे आहे. रस्त्यावरुन जाताना ड्रेनेजची झाकणे उघडी असतात. त्यात पाय घसरून पडण्याची भीती असते. तर काही ठिकाणी ड्रेनेजची झाकणे वरती आलेली असतात त्यामुळे चालताना ठेच लागते. तसेच रस्त्याच्या कडेला झाडांच्या फांद्या खूप वाढलेल्या असतात. दृष्टिहीन व्यक्तीला पांढऱ्या काठीने फक्त रस्त्याच्या खालचा भाग चाचपडता येतो. वरती अडथळा असल्यास तो दिसत नाही. त्या फांद्या चेहऱ्याला लागतात. तसेच विजेचे खांब कुठे लावले पाहिजेत याचे नियम आहेत. बऱ्याच ठिकाणी विजेचे खांब रस्त्यात पुढे आलेले असतात. बऱ्याचदा मध्यभागी असतात. बऱ्याचदा दृष्टिहीन व्यक्ती विजेच्या खांबांना चालताना धडकतात.

नियम काय सांगतो...

वाहतुकीचा नियम काय सांगतो की, जर एखादी दृष्टिहीन व्यक्ती रस्ता ओलांडत असेल तर गाड्यांनी थांबायला पाहिजे. मात्र, वाहनचालकांना याच्याशी काहीही देणेघेणे नसते. यासाठी महापालिका प्रशासन कोणाताही ठोस निर्णय घेत नाही. मनपा प्रशासन हे वाहतुक विभागाचे काम आहे म्हणून सोडून देते. खरेतर दोन्ही प्रशासनाने एकत्र येऊन हा प्रश्न सोडविला पाहिजे, अशी दृष्टिहिन व्यक्तींची मागणी आहे. फुटपाथवर काही वस्तू ठेवल्या असतात. एक तर रस्त्यावर चालू शकत नाही आणि फुटपाथवर चालू शकत नाही. मदिव्यांग सुलभ इमारती महापालिकेला शहरी विकास मंत्रालयाने जे मानक दिली आहेत, त्यानुसार शहरामध्ये कोणत्याही इमारतीचे स्ट्रक्चर होत नाही. दिव्यांगांना इमारती आणि उद्यानामध्ये प्रवेश करता येत नाही. महापालिका परिसरात बांधल्या जाणाऱ्या इमारतींना दिव्यांग सुलभ असल्याशिवाय परवानगी देवू नये. ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी व्हिज्युल अलार्म पाहिजे. ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी बेल लिपीतील फलक पाहिजे. दिव्यांग भवनची इमारती ज्या पदध्तीने बनविण्यात आली. त्यानुसार शहरातील सर्व इमारती व्हायला पाहिजे. इमारतींमध्ये रॅम्प, लिफ्ट, बेल लिपीतील सूचना फलक आणि विशेष स्वच्छतागृहे यांसारख्या सुविधा पुरवल्या पाहिजे. निदान पिंपरी चिंचवड महापालिकेने यावर विचार तरी केला आहे. पण हे काम फार धिम्या गतीने चालले आहे.

दिव्यांग भवन

महापलिकेने शहरात दिव्यांग भवन स्थापन केले आहे. पण त्याचे कार्य मोठ्या स्तरावर वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सल्लागार समिती नेमली आहे. पण सल्लागार फक्त सल्ला देतात. त्यांचे सल्ले कोणी आमलांत आणत नाही. त्यातील एकही गोष्टी त्याठिकाणी होत नाही. या समितीमध्ये फक्त पदाधिकारी नेमले आहेत. पण त्यांना काही अधिकारच नाहीत, असे एका सल्लागाराने सांगितले.

शहरात दृष्टीहिनांना स्वतंत्रपणे वावरण्यास फार अडथळे निर्माण झाले आहे. शहराचा विकास करण्याबरोबर दिव्यांगाच्या प्रश्नाकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. आम्हीदेखील या शहराचे नागरिक आहोत. शहरात दिव्यांग सुलभ फुटपाथ आणि इमारती तयार केल्या पाहिजेत. सध्या निवडणुकांचे दिवस आहेत. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे.
धनंजय भोळे (शैक्षणिक समन्वयक, सर्वसमावेशक शिक्षण व सुगम्यता केंद्र, पुणे विद्यापीठ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT