पिंपरी: चाकण परिसरात सिक्युरिटीचा व्यवसाय करायचा असेल तर खंडणी द्यावीच लागेल, अन्यथा जीवे मारून टाकण्याची धमकी देत तीन लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने फिल्मी शैलीत सापळा रचून अटक केली. आरोपीकडून ११ लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मसना ऊर्फ महेश सखाराम शिरोळे (२८, रा. मेदनकरवाडी, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीकांत शामराव बाबर (४४, रा. नवी सांगवी) यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रीकांत बाबर यांचा चाकण परिसरात सिक्युरिटीचा व्यवसाय आहे. २५ ते २९ जूनदरम्यान आरोपी महेश शिरोळे याने बाबर तसेच त्यांच्या कंपनीचे सुपरवायझर संदीप कणसे यांना मोबाईलवरून वारंवार संपर्क साधत, चाकणमध्ये माझी मोठी दहशत आहे. येथे व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावेच लागतील. अन्यथा तुला मारून टाकेन, अशी धमकी दिली. सुरुवातीला त्याने १० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर रक्कम कमी करत आठ, सात आणि अखेर सहा लाख रुपये देण्यास सांगितले. भीतीपोटी तक्रारदाराने तीन लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली; मात्र त्याच वेळी पोलिसांशी संपर्क साधला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने आरोपीला पकडण्यासाठी विशेष सापळा रचला. यासाठी ५०० रुपयांच्या १२ खऱ्या नोटा आणि 'चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया'च्या ५८८ हुबेहूब दिसणाऱ्या डमी नोटांचा वापर करण्यात आला. शंभर नोटांच्या सहा बंडलांमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा ठेवून तीन लाख रुपयांचे बनावट बंडल तयार करण्यात आले. ही रक्कम प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून सुपरवायझरकडे देण्यात आली.
ठरल्याप्रमाणे ३० जून रोजी दिघी येथील आळंदी-पुणे रस्त्यावरील मॅक्झिन चौकाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ आरोपी पैसे स्वीकारण्यासाठी आला. सुपरवायझरकडून पैशांची पिशवी स्वीकारताच दबा धरून बसलेल्या खंडणीविरोधी पथकाने त्याच्यावर झडप घालत रंगेहात अटक केली. आरोपीविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी उपनिरीक्षक अमर राऊत तसेच पोलिस शिपाई सुनील कानगुडे, प्रदीप पोटे, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, गणेश गिरीगोसावी, चंद्रकांत जाधव, किरण जाधव, संदीप गंगावणे आणि निलेश जाधव यांच्या पथकाने केली.