Suicide Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Suicide Case: पत्नी बेपत्ता; तणावात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

चार पानी चिठ्ठीत पोलिसांवर गंभीर आरोप; ‘पत्नी शोधण्यात मदत मिळाली नाही’ असा दावा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पत्नी बेपत्ता झाल्याने मानसिक तणावात असलेल्या तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना भोसरीतील धावडेवस्ती परिसरात गुरुवारी (दि. 5) सायंकाळी घडली. आत्महत्येपूर्वी तरुणाकडे सापडलेल्या चार पानी चिठ्ठीत पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, पत्नी शोधून देण्यासाठी पुरेशी मदत मिळाली नसल्याचा दावा त्याने केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिस यंत्रणेच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

केशरी प्रसाद साहू (रा. भोसरी, पुणे; मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साहू हा धावडे वस्तीतील एका बहुमजली इमारतीवर चढल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. इमारतीच्याकडेला उभा राहून तो उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे दिसताच नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. साहूला समजावून सांगत त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते. या वेळी साहूने पत्नीसोबत बोलण्याची मागणी केली. पोलिसांनी ही मागणी मान्य करत पत्नीसोबत फोनवर संभाषण घडवून आणले. मात्र, काही वेळाने साहूने अचानक इमारतीवरून खाली उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळी व साहूच्या अंगझडतीत चार पानी चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये त्याने आपल्या मानसिक अवस्थेचा उल्लेख केला आहे. साहू याची पत्नी बेपत्ता असून, तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा त्याचा संशय होता. याबाबत त्याने यापूर्वी पोलिसांकडे तक्रार दिली होती. संशयित व्यक्तींची चौकशी करावी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावीत, अशी मागणी त्याने केली होती. मात्र, या प्रकरणात पोलिसांकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप त्याने चिठ्ठीत केला आहे. या प्रकरणाचा तपास भोसरी पोलिस करत असून, सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. तसेच, पत्नी बेपत्ता होण्याच्या तक्रारीसंदर्भातही पुन्हा तपास सुरू करण्यात आला आहे.

पत्नीची चिंता

चिठ्ठीत साहूने भावनिक शब्दांत पत्नीबाबत चिंता व्यक्त केली असून, माझी बायको कुठेही जास्त काळ राहू शकत नाही. तिला माझ्याकडे परत आणा. ती परत येईल, असे नमूद केले आहे. तसेच, बायको माझ्यासोबत राहिली नाही तर मी केवळ मुलीसाठी जगेन, असा उल्लेखही त्यात आहे. आपल्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराबाबतही त्याने सूचना दिल्या असून, दफन करण्यात यावे किंवा अग्निसंस्कार मुलीच्या हस्ते करावेत, असे चिठ्ठीत लिहिले आहे. पत्नी जिथे आहे, तिथे ती जास्त दिवस राहणार नाही, तिला गावी सोडावे, अशी विनंतीही त्याने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT