पिंपळे गुरव: नियंत्रण सुटलेल्या बसने कंट्रोल केबिन आणि शेडला उडवल्याच्या गंभीर घटनेला तब्बल आठ दिवस उलटून गेले, तरी पिंपळे गुरव बसस्थानकावर प्रशासनाचा निष्काळजीपणा कायम आहे. अपघातानंतरचा विटा-सिमेंटचा ढिगारा आणि लटकणारी धोकादायक भिंत तशीच पडून असून, याकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या पीएमपी प्रशासनाचे डोळे नेमके कधी उघडणार? असा संतप्त सवाल आता नागरिक व प्रवाशांमधून विचारला जात आहे.
प्रशासकीय नाकर्तेपणाचा कळस
अपघाताला आठ दिवस उलटूनही साधा राडारोडा हटवण्याची तसदी न घेणारे पीएमपी प्रशासन नेमके झोपेचे सोंग घेऊन बसले आहे का?, प्रवाशांच्या जीवाशी चाललेला हा खेळ आणि कर्मचाऱ्यांची उन्हात होत असलेली होरपळ प्रशासकीय नाकर्तेपणाचा कळस दाखवणारी आहे. एखादा मोठा अपघात घडून कोणाचा बळी गेल्यावरच या सुस्त अधिकाऱ्यांना जाग येणार आहे का?, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
प्रवाशांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार
घटनास्थळी विखुरलेले विटा-सिमेंटचे तुकडे, सिमेंटचे मोठे ब्लॉक आणि अर्धवट पडलेली धोकादायक भिंत यामुळे बसस्थानक परिसरात अपघाताचा धोका कायम असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपळे गुरव बसस्थानकावर दररोज शेकडो प्रवाशांची वर्दळ असते. धोकादायक अवस्थेतील भिंतीचा भाग कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सुस्त कारभारामुळे कर्मचाऱ्यांची होरपळ
अपघातात केबिनचे छत व शेड उद्ध्वस्त झाल्यामुळे पीएमपीचे कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून रणरणत्या उन्हात बसून कामकाज पाहत आहेत. हजेरी नोंदवणे असो किंवा बसच्या फेऱ्यांचे नियोजन कर्मचाऱ्यांना डोक्यावर सावलीही उपलब्ध नाही. एका बाजूला भीषण ऊन आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षेचा कोणताही आधार नाही, अशा बिकट परिस्थितीत कर्मचारी सेवा देत आहेत. प्रशासनाच्या या बेफिकीर आणि असंवेदनशील वृत्तीमुळे कर्मचाऱ्यांची प्रचंड हेळसांड होत आहे
सुरक्षित निवारा शेड उभारण्याची मागणी
अपघातानंतर २४ तासांच्या आत राडारोडा हटवून परिसर सुरक्षित करणे आणि कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरती शेड उभारणे गरजेचे होते, मात्र आठवडा उलटूनही परिस्थिती जैसे थे ठेवून पीएमपी प्रशासन नेमकी कसली वाट पाहत आहे? केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांची अन् आश्वासनांची कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर उतरून कारवाई करण्याची वेळ आता आली आहे. संबंधित विभागाने तत्काळ घटनास्थळावरील कचरा व राडारोडा हटवावा, धोकादायक भिंत पाडून परिसर सुरक्षित करावा आणि उन्हात होरपळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
नवीन केबिन उपलब्ध होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी शेजारील पास केंद्राच्या मोठ्या केबिनमध्ये बसून कामकाज करावे. तसेच, घटनास्थळी पडलेला राडारोडा येत्या काही दिवसांत उचलून नेण्यात येईल.दत्तात्रय तुळपुळे, मुख्य अभियंता, स्थापत्य पीएमपी
अपघात होऊन आठ दिवस उलटले तरी राडारोडा हटवला जात नाही, ही गंभीर बाब आहे. बस स्थानकावर दररोज अनेक प्रवासी ये-जा करतात. अशा परिस्थितीत धोकादायक भिंत आणि विखुरलेले विटा प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी. कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरती सुरक्षित व्यवस्था करून तातडीने राडारोडा हटवावा. केवळ आश्वासने नकोत तर कारवाई दिसली पाहिजे.सुरेश सकट, सामाजिक कार्यकर्ता