

चिंचवड: दिवाळी दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठत फराळाच्या पदार्थाची तयारी सुरू झाली आहे, मात्र यंदा महागाईमुळे फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दरात वाढ झाली आहे. तेल, डाळी, साखर, मसाले, सुकामेवा आणि तुपाच्या दरवाढीचा परिणाम तयार फराळाच्या किमतीवर झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ग्राहकांच्या खिशाला जादा भुर्दंड
दिवाळी सणासाठी घराघरात फराळ तयार करण्याची परंपरा आहे. घरोघरी विविध पदार्थ बनवण्याची परंपरा आहे, मात्र नोकरी-व्यवसायामुळे वेळेची कमतरता असणाऱ्या कुटुंबाकडून तयार फराळ खरेदी करण्याला पसंती दिली जाते. त्यामुळे दिवाळीच्याकाळात मिठाईची दुकाने आणि फराळ विक्री केंद्रावर ग्राहकांची गर्दी वाढते. दुष्काळी परिस्थितीमुळे कृषी उत्पादने आणि पुरवठा घटल्याने ही तयार फराळांचे दर वाढत आहेत. त्यामुळे यंदा ग्राहकांच्या खिशाला जादा भुर्दंड पडणार आहे.
यंदाची दिवाळी खर्चिक असणार
दरवाढीमुळे दिवाळीचा गोडवा वाढवणाऱ्या तयार लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसी, चकली यासारख्या पदार्थांसाठी यंदा ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कमी पावसामुळे विविध पिकांच्या उत्पादनातील घट आणि तुलनेत कायम असलेल्या मागणीमुळे दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या बहुतांश वस्तूंच्या दरात गतवर्षाच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढलेल्या दरामुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार असून, यंदाची दिवाळी अधिक खर्चिक असणार आहे.
दररोजचा किराणाही घेणे झाले अवघड
फक्त दिवाळीच्या फराळाचे साहित्यच नव्हे तर दररोज लागणारे धान्यांच्या दरातही वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा डाळ, तांदूळ आणि शेंगदाण्याचे दर वाढले आहेत. चांगल्या प्रतिच्या ज्वारीचे दर ८० रुपयांच्या जवळपास पोचल्याने भाकरी आता श्रीमंताचे खाद्य बनले आहे. तसेच, हरभरा डाळ आणि तांदळाच्या किमतीतदेखील झपाट्याने वाढ झाली आहे.
दुष्काळाचा परिणाम
फराळ तयार करण्यापासून ते दिवाळीच्या खरेदीपर्यंत सर्वच खर्च वाढला आहे. यंदा राज्यातील अनेक भागात अत्यल्प पाऊस पडला आहे. त्याचा थेट परिणाम खरीप पिकांवर झाला. काही भागात शेतकऱ्यांच्या हातची पीक गेली तर अनेक ठिकाणी उत्पादनात घट झाली. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या धान्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातच ऐन सणासुदीच्या काळात अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
खोबऱ्याचे दर ४०० रुपये किलोच्या पुढे
दिवाळीच्या फराळासाठी प्रामुख्याने वापरले जाणारे पोहे, तांदूळ, साखर, तेल, खोबरे, भाजकी डाळ, हरभरा डाळ, बेसन आणि सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने फराळाचा खर्च वाढणार आहे. चकली, चिवडा, लाडू आणि करंजी यासारखे पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी साहित्यांच्या किमती वाढल्यामुळे घरगुती फराळाचे गणितही बदलणार आहे. विशेषतः खोबऱ्याचे दर प्रति किलो ४०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. तेलाच्या किमतीतही वाढ झाल्याने तळणीच्या पदार्थाचा खर्च वाढणार आहे.
काटकसरीत साजरी करावी लागणार दिवाळी...
एकीकडे दिवाळीचा उत्साह आणि दुसरीकडे वाढती महागाई अशा दुहेरी परिस्थितीत यंदाचा सण साजरा करावा लागणार आहे. फराळाचा गोडवा कायम ठेवताना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान सर्वसामान्य कुटुंबांसमोर उभे राहिले आहे. यंदाच्या दिवाळीत आनंदासोबत काटकसरीचे गणितही महत्त्वाचे ठरणार आहे. दिवाळीत घरी फराळ तयार करण्याची परंपरा आजही अनेक कुटुंबांमध्ये जपली जाते, मात्र यंदा खर्च साहित्य एकाचवेळी खरेदी करताना ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
आनंदाने करण्यात येणाऱ्या दिवाळीच्या फराळाला महागाईची तीव्र झळ बसली असून, फराळासाठी लागणाऱ्या बहुतांशी वस्तूंचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. साखर, गुळ, बेसन, डाळी आणि पोह्यांच्या विविध प्रकारांमध्ये वाढ झाल्याने आमचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आमचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमंडले आहे.
आशा गायकवाड, गृहिणी
नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. यासाठी सरकारने काहीतरी तोडगा काढावा आणि सर्व वस्तूंचे दर कमी करावेत.
अश्विनी बनकर, गृहिणी
दिवाळीच्या फराळासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात भर पडली आहे. बेसन, रवा, साखर, खाद्यतेल, तूप आणि सुकामेवा आदी साहित्यांच्या दरवाढीचा परिणाम तयार पदार्थांच्या किमतीवर झाला आहे. तसेच, इतर वस्तूंच्या दरात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
सोमनाथ पाचपुते, किराणा व्यापारी