

पिंपरी: सवलतीमध्ये एस.टी. प्रवासासाठी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली आहे; परंतु अद्याप कार्ड हातात पडलेले नाही, अशा प्रवाशांना आता सवलतीसाठी कार्ड येण्याची वाट पाहावी लागणार नाही. नोंदणीनंतर मिळणाऱ्या क्यूआर कोडयुक्त पावतीच्या आधारे ३० दिवस सवलतीचे तिकीट देण्याची राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे कार्ड वितरणाला विलंब झाला,तरी सवलत पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एस.टी बसगाड्यांतून सवलतीचा प्रवास करता येणार आहे.
एस. टी. च्या प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड अर्थात एनसीएमसीची नोंदणी आणि वितरण सुरु एस.टी. तसेच एजंटद्वारे सुरु आहे. १ ऑक्टोबरपासून सवलतीच्या प्रवासासाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे अद्याप कार्ड न काढलेल्या प्रवशांना पूर्ण भाडे भरुन प्रवास करावा लागत असून,कार्ड नोंदणीसाठी गर्दी वाढली आहे.
नोंदणीची प्रकिया पूर्ण केल्यानतंर प्रत्यक्ष कार्ड प्रवाशांच्या हाती येण्यासाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागतो.या प्रतीक्षेत पात्र प्रवाशांना सवलतीपासून वंचित राहावे लागू नये ,यासाठी मंहामंडळाने क्यूआर कोडयुक्त पावतीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. राज्य सरकारच्या योजनांनुसार महिलांना आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.च्या प्रवासी भाडयात ५० टक्के सवलत दिली जाते. तसेच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या महिला व पुरुषांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा आहे.या पात्र सवलतधारकांना क्यूआर पावतीच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
३० दिवसांची मुदत
क्यूआर कोड असलेल्या पावती नोंदणीच्या तारखेपासून केवळ ३० दिवस ग्राह्य राहणार आहे.या कालावधीत प्रवाशांनी प्रत्यक्ष एनसीएमसी कार्ड प्राप्त करुन ते सक्रिय करणे आणि त्यामध्ये आवश्यक रकमेचा भरणा अर्थात टॉप-अप करणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतर पावतीच्या आधारे सवलतीचे तिकीट मिळणार नाही. त्यामुळे पावती जपून ठेवण्याबरोबर कार्ड सक्रिय करण्याची प्रक्रियाही नागरिकांना वेळेत पूर्ण करावी लागणार आहे.
एनसीएमसी कार्डमध्ये क्यूआरकोडच्या आधारे रिजार्च करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे टॉप-अपसाठी वारंवार केद्रांवर जाण्याची गरज नाही; तसेच लाभर्थ्यांनी नोंदणीची पावती सोबत ठेऊन ३० दिवसांच्या आत कार्ड सक्रिय करावे व आवश्यक टॉप अप करुन घ्यावा.
अरुण सिया, वाहतूक नियंत्रक, एस. टी. पुणे विभाग