पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यांवर तब्बल 10 हजार 288 हरकती प्राप्त झाल्या आहेत. विक्रमी संख्येने दाखल झालेल्या हरकतींचा निपटारा करण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त तसेच, इतर अधिकारी व कर्मचारी व्यक्त आहे. अल्पकालावधीत काम पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार संघाची मतदार यादी फोडून महापालिकेने 1 ते 32 प्रभागानिहानुसार मतदार यादी तयार केली. ती प्रारुप मतदार यादी महापालिकेने 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली. महापालिका कर्मचार्यांच्या चुकारपणामुळे मतदार यादीचा घोळ झाल्याने गोंधळ उडाला. या गोंधळामुळे महाविकास आघाडीने महापालिका भवनासमोर मतदार यादी जाळून त्याची होळी केली होती. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. त्यावर राजकीय पक्ष, माजी नगरसेवक, इच्छुक व नागरिकांनी 27 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 10 हजार 288 हरकती दाखल केल्या आहेत.
त्या हरकतींचा निपटारा करुन अंतिम मतदार यादी बुधवारी (दि.10) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि.15) किंवा मंगळवारी (दि.16) संपूर्ण काम पूर्ण करून, सर्व याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या संगणक प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक आहे. उर्वरित कमी कालावधीत काम पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय नेमलेल्या आठ उपायुक्तांची धावपळ सुरू आहे.
आठ क्षेत्रीय अधिकारी, आठ कार्यकारी अभियंता, 1 हजार 453 बीएलओ, 280 प्रगणक, 49 पर्यवेक्षकांच्या मदतीने हरकतींवर कार्यवाही केली जात आहे. हरकतीची छाननी केली जात आहे. कार्यवाही योग्य प्रकारे झाली किंवा नाही, हे उपायुक्त तपासून घेत आहेत. कामकाज मुदतीत संपावे म्हणून सुटीच्या दिवशीही कामकाज केले जात आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सक्त ताकीद दिल्याने अधिकारी व कर्मचार्यांनी गांभीर्याने काम करीत असल्याचे चित्र आहे. परिणामी, संबंधित अधिकारी व कर्मचार्यांच्या विभागांचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे.
हरकतींवर उपायुक्तांकडून कार्यवाही
प्रारूप मतदार यादींबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांची छाननी करुन निर्णय घेण्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपायुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. उपायुक्त पंकज पाटील (अ क्षेत्रीय कार्यालय), व्यंकटेश दुर्वास (ब क्षेत्रीय कार्यालय), डॉ. प्रदिप ठेंगल (क क्षेत्रीय कार्यालय), चेतना केरुरे (ड क्षेत्रीय कार्यालय), राजेश आगळे (इ क्षेत्रीय कार्यालय), सीताराम बहुरे (फ क्षेत्रीय कार्यालय), अण्णा बोदडे (ग क्षेत्रीय कार्यालय) आणि संदिप खोत (ह क्षेत्रीय कार्यालय) हे प्राधिकृत अधिकारी काम करीत आहेत. प्रत्येक हरकतींचा छाननी करून, योग्य प्रकारे निपटारा करण्यासाठी ते कार्यवाही करीत आहेत. त्यामुळे आपल्या विभागाचे दैनंदिन कामकाज बाजूला सारण्यात आले आहे.