वर्षा कांबळे
पिंपरी: महापालिकेच्या शाळांतील अनेक शिक्षक एसआयआर तसेच जनगणना अशा कामात गुंतले आहेत; मात्र शिक्षकांच्या या कामाच्या व्यग्रतेमुळे पालिका शाळांतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांना मराठी वाचनही करता येत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या परिस्थितीवरून आपला पाल्य शाळेत जातोय; पण शिकतोय काय? असा प्रश्न या पालकांना पडला आहे.
एसआयआर कामकाजामुळे शिक्षक शाळेबाहेर
एक शिक्षक एसआयआर कामावर गेल्याने ४० - ५० मुलांचा वर्ग इतर मानधनावरील शिक्षकांना सांभाळावा लागतो. शैक्षणिक मूल्यमापन नाही. वह्या तपासणे, चाचण्या घेणे, पालक मेळावे बंद. जी मुले पहिली आणि दुसरी इयत्तेत शिकत आहेत. त्यांच्या पायाभूत शिक्षणावर परिणाम झाला आहे. शाळेत जावून फक्त डबा खाणे आणि खेळ खेळणे यामुळे अभ्यासातील गोडी संपुष्टात येत आहे. आधीच लिहिता-वाचता येईना अशी परिस्थिती, त्यात ही भर याचा परिणाम म्हणून पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मूलभूत वाचन-लेखन-गणित येत नाही. ३ री व ४ थी चे मूल साधे वाक्य वाचू शकत नसल्याचे चित्र आहे.
शैक्षणिक गुणवत्ता ढासळल्याचा पालकांचा आरोप
निवडणूक आयोगाच्या बीएलओ म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर आणि एसआयआर म्हणजे मतदार यादी विशेष पुनरीक्षणाच्या कामात तसेच इतरही अशैक्षणिक कामात शिक्षक गुंतल्याने पिंपरी-चिंचवड पालिका शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता ढासळल्याचा आरोप पालक आणि शिक्षक संघटना करत आहेत. पालिका शाळांतील अनेक शिक्षकांना गेल्या ३ - ४ महिन्यांपासून मतदार यादी दुरुस्ती, नवीन नाव नोंदणी, घरोघरी सर्वेक्षण यासारखी बीएलओची कामे देण्यात आली आहेत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळली असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
सरकारी कामे की अध्यापन?
मागील दोन वर्षे निवडणुकांचे कामकाम होते. त्यामुळे अनेक शिक्षकांना बीएलओचे कामकाज देण्यात आले होते; तसेच शिक्षकांना निवडणूक कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. शाळेचे वर्ग सुटल्यानंतर आणि सुटीच्या दिवशीही कामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे शाळेत शिकवायचे कधी? की ही कामे करायची? निवडणुकीच्या कामात अडकल्यामुळे शिक्षकविना विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती शाळांमध्ये होती.
पालकांचा संताप
आम्ही मुलांना शाळेत शिकण्यासाठी पाठवतो; परंतु शिक्षकच नसतील तर आमचा पाल्य शिकणार काय, पालिका शाळांतील शिक्षकांना दुसऱ्याच कामात गुंतवल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
माझा नातू चौथीमध्ये गेला पण अजून नीट लिहिता वाचता येत नाही. शेजारी त्याच्या वयाचा मुलगा खासगी शाळेत शिकतो. त्याला चांगले लिहिता वाचता येते. पहिल्या आणि दुसऱ्या इयत्तेपर्यंत समजू शकतो. पण चौथीमध्ये गेल्या तरी प्रगती नाही. सुट्टीमध्ये पालिकेचे शिक्षकच येवून मनपा शाळांमध्ये प्रवेश घ्या म्हणातात. खाजगी शाळेची फी परवडत नाही म्हणून मनपात घातले.सुरेखा साबळे (पालक)
गेल्या वर्षीपासून शिक्षकांना निवडणूक कामकाज, जनगणना आणि आता एसआयआरचे काम तसेच इतरही अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना शिकवायला वेळच नाही. मिळेल त्या वेळेत शिक्षक वर्गात अध्यापन करतात. मात्र, ही कामे पूर्ण झाल्यानंतर अप्रगत मुलांच्या प्रगतीसाठी विशेष लक्ष दिले जाईल.संगीता बांगर (प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका)