

खराळवाडी: पिंपरी चिंचवड शहरात व उपनगरांत महावितरणच्या वतीने ग्राहकांना विद्युत जोड देण्यासाठी छोटे डीपी बॉक्स शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर तसेच सोसायटीच्या समोर, अंतर्गत रस्त्यांवर उभारले आहेत. परंतु त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी महावितरणने शहरातील धोकादायक डीपी बॉक्स, उघड्यावरील वायरिंग यांची पाहणी करून ते सुरक्षित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपरी शहरातील गांधीनगर परिसरात विद्युत डीपी (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) भोवती वीजमीटरसाठी टाकण्यात आलेल्या वायरिंगचा विळखा पडल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी तारा उघड्यावर लोंबकळत असून, डीपी परिसरात कोणतीही सुरक्षित व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाळ्यात शॉर्टसर्किट, विजेचा धक्का किंवा आग लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महावितरणने तातडीने सुरक्षित डीपी व शिस्तबद्ध वायरिंगची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नागरिकाच्या म्हणण्यानुसार, एका डीपीवर अनेक मीटर जोडण्यासाठी अनियोजित पद्धतीने वायरिंग करण्यात आली आहे. त्यामुळे तारा एकमेकांत गुंतल्या असून डीपीभोवती धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातून नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची सतत ये-जा असल्याने संभाव्य अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
डीपीभोवती गुंतागुंतीच्या तारा पाहून भीती वाटते. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक धोकादायक बनते. कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी महावितरणने सुरक्षित वायरिंग करून डीपीची दुरुस्ती करावी. नागरिकांच्या जीवाशी खेळू नये.
पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती नको
मागील काही दिवसांपूर्वी उघड्या विद्युत वायरिंगमुळे एका ज्येष्ठ महिलेला चालतातना धक्का लागल्याने शॉक बसून जागीच मृत्यू झाला. अशीच स्थिती शहरातील बहुतांश भागात पाहण्यास मिळत आहे. तरी महावितरणने शहरातील धोकादायक डीपीबॉक्स वायरिंगचे जाळे उघड्यावर न ठेवता ते सुरक्षित करणे गरजेचे आहे. अन्यथा एखाद्याचा बळी जाऊ शकतो.
घरासमोर उघड्यावर मीटरचे वायरिंग बसवल्यामुळे वायरिंग पार्क होऊन त्यातून जाळ बाहेर येतो. तरी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. तरी महावितरण विभागाने याची गंभीर दखल घ्यावी.
रहिवासी
गांधीनगर परिसरातील संबंधित डीपीची पाहणी करून तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येईल. ज्या ठिकाणी असुरक्षित वायरिंग किंवा तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता आढळेल. तेथे नियमानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येईल. घरासमोर मीटरचे वायरिंग धोकादायक स्थितीत असलेले त्याला योग्य ठिकाणी बाॅक्समध्ये फिट केले जाईल.
राहुल पालखे, सहायक अभियंता, विद्युत विभाग