पिंपरी : इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृतीसाठी मोशी येथे रिव्हर सायक्लोथॉन हा उपक्रम नुकताच घेण्यात आला. भाजपचे आमदार महेश लांडगे तसेच, खासगी संस्था व पिंपरी-चिंचवड महापालिकडून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी महापालिकेने 20 लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे.
इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृतीसाठी दरवर्षी रिव्हर सायक्लोथॉन उपक्रम घेण्यात येतो. त्यात हजारो सायकलस्वार सहभागी होतात. त्यात लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असतो. हा उपक्रम अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्यावतीने तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आयोजित केला जातो.
त्या उपक्रमााची प्रसिद्धी करणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी छायाचित्रीकरण व व्हिडीओग्राफी करणे, ड्रोन कमेरा, एलईडी स्क्रीन आदी व्यवस्था करणे, सेल्फी पॉईट, फ्लेक्स प्रिन्टींग, पीएमपीएल बस, मेट्रो, रेडिओ, टीव्ही, चित्रपटगृहात जाहिरात करणे तसेच, विविध माध्यमाचा वापर करुन जाहिरात करणे या कामांचा 20 लाख रुपयांचा खर्च महापालिकेने द्यावा, असे पत्र अविरत संस्थेने महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडे 20 ऑक्टोबर 2025 ला दिले होते.
त्यानुसार जनसंपर्क विभागाने 20 लाख रुपये खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्या खर्चाला आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारी (दि.11) स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
डुडुळगावातील रस्त्याच्या जागेसाठी पालिका वन विभागास देणार दहा लाख रुपये पिंपरी-चिंचवड महापालिकेस डुडुळगाव येथील चऱ्होली फाटा ते डुडुळगाव या 30 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी वन विभागाची 9 हजार 114.74 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी वन विभागास 10 लाख 19 हजार 516 रुपये अदा करण्यात येणार आहे. त्यानंतर ती जागा उपलब्ध झाल्यानंतर हा डीपी रस्ता विकसित करता येणार आहे. यामुळे परिसरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
महापालिकेकडून चऱ्होली फाटा ते डुडुळगाव या 30 मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी डुडुळगाव येथील गट क्रमांक 190 पैकी 9 हजर 114.74 चौरस मीटर क्षेत्रफळाची वन विभागाच्या जागेची आवश्यकता आहे. ती जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी वन विभागाने 10 लाख 19 हजार 516 रुपयांची मागणी केली होती. ती रक्कम अदा करण्याचा प्रस्ताव नगर रचना विभागाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे.
जागा उपलब्ध झाल्यानंतर महापालिकेच्या स्थापत्य विभागास तेथे 30 मीटर रुंदीचा रस्ता करता येणार आहे. परिणामी, परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.