Property Tax Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Property Tax Discount: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकरावर 50% पर्यंत सवलत; 30 जूनपर्यंत लाभ घेण्याचे आवाहन

ऑनलाइन कर भरणाऱ्यांसह महिला, दिव्यांग व पर्यावरणपूरक उपक्रमांना विशेष सवलती; 1 जुलैपासून जप्ती कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वेळेत मालमत्ताकर भरणार्‍या, ऑनलाइन मालमत्ताकर, महिला मालमत्ताधारक, दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक तसेच, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार्‍या संस्थांसाठी 5 ते 50 टक्क्यांपर्यंतच्या विविध सवलती देण्यात येतात. या सवलतींचा लाभ मंगळवार (दि.30) पर्यंत घेता येणार आहे. नागरिकांनी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

तीस जूनपूर्वी कर भरल्यास मिळणारी 5 टक्के सवलत आणि ऑनलाइन कर भरण्यासाठी मिळणारी अतिरिक्त 5 टक्के सवलत यामुळे पात्र मालमत्ताधारकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. महिलांच्या नावावरील निवासी मालमत्तांसाठी 30 टक्के, दिव्यांग व्यक्तींसाठी 50 टक्के आणि स्वातंत्र्यसैनिक, विधवा पत्नी यांना मालमत्ताकरात सवलत आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणार्‍या हाऊसिंग सोसायट्या व आस्थापनांनाही विविध सवलती दिल्या जातात. कंपोस्टिंग प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), झिरो वेस्ट संकल्पना तसेच, ग्रीन बिल्डिंग उपक्रम राबविणार्‍या संस्थांना 3 ते 15 टक्क्यांपर्यंत सवलत आहे. त्याचा लाभ नागरिकांना घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामान्यकरावरील प्रमुख सवलती

तीस जूनपूर्वी कर भरल्यास - 5 टक्के सवलत, ऑनलाइन कर भरल्यास - 5 टक्के अतिरिक्त सवलत, महिलांच्या नावावरील एका निवासी मालमत्तेस - 30 टक्के सवलत, दिव्यांग व्यक्तीच्या नावावरील एका मालमत्तेस - 50 टक्के सवलत, स्वातंत्र्यसैनिक, सैनिक विधवा पत्नीस एका निवासी मालमत्ता करावर सवलत किंवा त्यांच्या पत्नींच्या एका निवासी मालमत्तेस - 50 टक्के सवलत, ऑनसाइट कंपोस्टिंग - 5 टक्के सवलत, एसटीपी प्लांट - 3 टक्के सवलत, कंपोस्टिंग व एसटीपी दोन्ही - 8 टक्के सवलत, झिरो वेस्ट प्रकल्प - 8 टक्के सवलत, झिरो वेस्ट व एसटीपी - 10 टक्के सवलत, ग्रीन बिल्डिंग - 5 ते 15 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते.

एक जुलैपासून जप्ती कारवाई सुरू करणार

मालमत्ताकरावरील विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी मंगळवार (दि.30) पर्यंतची मुदत आहे. त्यानंतर 1 जुलैपासून थकीतकर वसुलीसाठी नियमानुसार कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये नोटिसा, जप्ती तसेच, इतर कायदेशीर उपाययोजनांचा समावेश असू शकतो. नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी व उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्यासाठी मुदतीपूर्वी मालमत्ताकर भरावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT