Cyber Fraud Pudhari
पिंपरी चिंचवड

New Year APK Scam: नववर्षाच्या शुभेच्छांच्या नावाखाली एपीके फाईल फसवणूक; पोलिसांचा इशारा

संशयास्पद एपीके फाईलमुळे मोबाईल हॅक होण्याचा धोका; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पुढारी डिजिटल टीम

बारामती: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो; परंतु या कालावधीत सायबर गुन्हेगारांकडून Happy New Year नावाची एपीके फाईल पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सायबर गुन्हेगारांकडून पाठवली जाणारी ही एपीके फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा मोबाईल हॅक होऊ शकतो. त्यातून ओटीपी, बँक खात्याची माहिती, वैयक्तिक डेटा चोरीला जाणे तसेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी

ओळख नसलेल्या व्यक्तीकडून आलेली एपीके फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये, संशयास्पद लिंक किंवा फाईल इतरांना फॉरवर्ड करू नये, कोणतीही फाईल उघडण्यापूर्वी तिचा एक्स्टेन्शन तपासावा. ‌‘हॅप्पी न्यू इअर‌’, ‌‘ग््रािटिंग कार्ड‌’, ‌‘व्हिडीओ‌’ अशा आकर्षक नावाच्या फाईल्सपासून सावध राहावे.

सायबर फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद संदेश प्राप्त झाल्यास नागरिकांनी ताबडतोब 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा https://cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी आवाहन केले.

नववर्ष सुरक्षित आणि आनंदात साजरे करण्यासाठी नागरिकांनी सोशल मीडियावर येणाऱ्या अशा संदेशांबाबत जागरूक रहावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT