Battle of Bhima Koregaon: भीमा कोरेगाव युद्धामागचा इतिहास काय आहे? 1 जानेवारी 1818 ला नेमकं काय घडलं होतं?
What is the Battle of Bhima Koregaon: पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर असलेले कोरेगाव हे गाव केवळ एक भौगोलिक ठिकाण नाही, तर भारतीय इतिहासातील एका संघर्षाचा साक्षीदार आहे. 1 जानेवारी 1818 रोजी येथे झालेली भीमा कोरेगावची लढाई आजही सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. ही लढाई इंग्रज आणि पेशवाई यांच्यात झाली असली, तरी तिचा केंद्रबिंदू होता महार समाजाचा स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्धचा संघर्ष.
पेशवाईचा अंत आणि संघर्षाची पार्श्वभूमी
18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा साम्राज्य अंतर्गत संघर्षांमुळे कमकुवत होत चाललं होतं. पेशवे बाजीराव दुसरे (1796–1818) यांच्या कारकिर्दीत ईस्ट इंडिया कंपनीशी दोन मोठी युद्धे झाली. या संघर्षांत पेशवाईचा पराभव झाला आणि मध्य-पश्चिम भारत इंग्रजांच्या सत्तेखाली आला.
त्या काळात पेशवाईत जातिभेद आणि अस्पृश्यतेचे कठोर नियम होते. महार, मांग आणि इतर अस्पृश्य समाजाला सार्वजनिक जीवनात अपमानास्पद वागणूक दिली जात होती. रस्त्यावर चालताना त्यांच्या पावलांचे ठसे पुसण्यासाठी कंबराला काटेरी फांदी बांधण्याची सक्ती होती. गळ्यात मडकी लटकवणे, जमिनीवर झोपणे आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकारही त्यांना नव्हता, अशी अमानवी वागणूक त्यांना दिली जात होती.
युद्धाची सुरुवात कधी झाली?
31 डिसेंबर 1817 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टन फ्रान्सिस स्टॉंटन यांच्या नेतृत्वाखालील तुकडी शिरुरहून कोरेगावकडे निघाली. या सैन्यात सुमारे 834 सैनिक होते. त्यात बॉम्बे नेटिव्ह लाइट इन्फंट्रीचे सुमारे 500 महार सैनिक, तोफा, काही युरोपियन तोफखान्याचे सैनिक आणि घोडदळाचा समावेश होता.
दुसऱ्या बाजूला पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याची संख्या 25 ते 28 हजारांपर्यंत होती. मराठा, अरब, गोसावी अशा विविध तुकड्यांचा त्यात समावेश होता.
भीमा नदीच्या काठावर लढाई
1 जानेवारी 1818 रोजी पहाटेपासून भीमा नदीच्या परिसरात जोरदार लढाई सुरू झाली. पेशव्यांना वाटत होते की इंग्रज नदी पार करतील, मात्र इंग्रज सैन्याने कोरेगाव ताब्यात घेतले आणि तिथेच लढाई जिंकली. जवळपास 16 तास चाललेल्या संघर्षात, संख्येने कमी असलेल्या महार सैनिकांनी शौर्य दाखवले.
इतिहासकार जेम्स ग्रँट डफ यांच्या नोंदींनुसार, या लढाईत महार सैनिकांनी माघार घेतली नाही. पण पेशव्यांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. हा पराभव केवळ सैनिकी नव्हता, तर पेशवाईच्या सत्तेच्या ऱ्हासाचा निर्णायक टप्पा होता.
विजयस्तंभ : शौर्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक
या लढाईनंतर ब्रिटिशांनी भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारला. या स्तंभावर लढाईत शहीद झालेल्या 20 महार सैनिकांची नावे कोरण्यात आली आहेत. हा स्तंभ केवळ इंग्रजांच्या विजयाचे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मानवंदना
1 जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या विजयस्तंभाला भेट देऊन शहीद सैनिकांना मानवंदना दिली. त्यानंतर भीमा कोरेगावची लढाई दलित समाजाचा स्वाभिमान, समतेच्या लढ्याचे आणि इतिहासातील अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक बनली. आजही दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातून लाखो लोक भीमा कोरेगावला येऊन विजयस्तंभाला अभिवादन करतात.
भीमा कोरेगावची लढाई ही फक्त इंग्रज विरुद्ध पेशवे अशी नव्हती. ती सामाजिक अन्यायाविरुद्ध उभा राहिलेल्या शोषित समाजाच्या धैर्याची आणि स्वाभिमानाची कहाणी आहे. म्हणूनच 200 वर्षांनंतरही या लढाईचा इतिहास जिवंत आहे.

