पिंपरी : गतवेळच्या निवडणुकीत या प्रभागामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत भाजपाचे एक माजी नगरसेवक शिवसेनेत गेला आहे. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल अधिक मजबूत असल्याचा दावा केला जात आहे. प्रभागात राष्ट्रवादी व भाजपा महायुतीमध्ये संघर्ष दिसत आहे.
प्रभागात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर तसेच, निशिगंधा संदीप भोंडवे, स्नेहा तावरे हे इच्छुक आहेत. भाजपाकडून माजी नगरसेविका संगीता भोंडवे, दीपक भोंडवे, शिल्पा राऊत, छाया राऊत, डॉ. हेमंत देवकुळे, प्रा. अनिल पवळ, नारायण ढिंगळकर असे अनेक जण इच्छुक आहेत. भाजपातून शिवसेनेत गेलेले माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, शिवसेनेकडून श्रेया गायकवाड-तरस, नीलेश तरस, ऐश्वर्या राजेंद्र तरस हे देखील इच्छुक आहेत. आरपीआयकडून धर्मपाल तंतरपाळे, मनसेकडून अस्मिता माळी तसेच, वृंदा गणेश भोंडवे, संदीप ठाकूर, सचिन सिद्धे, प्राजक्ता रुद्रवार, बाळासाहेब तरस, नवनाथ तरस, गोरख तरस, अशोक बनसोडे, जया राऊत, नवनाथ लोखंडे, दिलीप परदेशी आदी इच्छुक आहेत. प्रभागात संपूर्ण पॅनेल आपल्या ताब्यात घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तर, भाजपा महायुतीकडून प्रभागावर कब्जा करण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.
शहरातील सर्वाधिक मतदार असलेला हा मोठ्या क्षेत्रफळाचा तसेच, दाट लोकवस्तीचा प्रभाग आहे. शहराच्या टोकाकडील हा भाग आहे. रावेत भागात सर्वाधिक हाऊसिंग सोसायट्या आहेत. शहरातील अतिविकसित भाग म्हणून रावेतकडे पाहिले जाते. या भागात राहण्यास नागरिकांकडून पसंती दिली जाते. वाल्हेकरवाडीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही भागांत पाणी कमी दाबाने येते. सोसायट्यांना खासगी टँकरने पाणी मागवावे लागते. परिसरात रात्रभर सुरू असलेल्या बांधकामांच्या कर्कश आवाजामुळे तसेच, धुळीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. वायू व ध्वनी प्रदूषणाने रहिवासी त्रस्त आहेत.
इमारती उभ्या करताना नैसर्गिक नाले बुजविल्याने आजूबाजूच्या हाऊसिंग सोसायटीत पावसाचे पाणी शिरते. पावसाचे पाणी साचून वाहतूक कोंडी होते. अर्बन स्ट्रिट डिजाईन रस्ते विकसित करताना रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. पदपथावर विक्रेते व दुकानदार व पत्राशेडच्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होते. रसत्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली जाते. परिसरात शैक्षणिक संस्था असल्याने तरुणी व महिलांना रोडरोमिओचा त्रास होतो. वारंवार वीज खंडित होत असल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. पवना नदी अतिप्रदूषित झाली आहे. अनेक कच्चे रस्ते विकसित करण्यात आले नाहीत. किवळे व मामुर्डी भागात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
वाल्हेकरवाडी भाग, गुरुद्वारा, नॅनो होम सोसायटी, शिंदेवस्ती, रॉयल कासा सोसायटी, सेक्टर क्रमांक 29, रावेत, नंदगिरी सोसायटी, विकासनगर, क्रिस्टल सिटी, के टाऊन सोसायटी, सिल्व्हर ग्रेसिया सोसायटी, भालचंद्र विहार सोसायटी, सेलेस्टीयल सिटी फेज टू, मामुर्डी, किवळे आदी.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-एससी,
ब-ओबीसी महिला,
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
रखडलेल्या निगडी-रावेत उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्याने निगडीहून थेट किवळेतील मुकाई चौकापर्यंत वेगात ये-जा करता येते. त्यामुळे एक्सप्रेस वे व पुणे-मुंबई जुना महामार्ग जोडला गेला आहे. निगडी ते मुकाई चौकापर्यंत बीआरटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अर्बन स्ट्रीट डिजाईनने सुशोभिकरण करण्यात येत आहे. तसेच, चौक सुशोभित केले आहेत. अंतर्गत रस्ते विकसित करण्यात येत आहेत. आरक्षित जागा विकसित करण्यात येत आहे. कचरा हस्तांतरण केंद्र सुरू केले असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चौकांत सुधारणा करण्यात आल्या आहेत.