Chinchwad Crime Case
पिंपरी: चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खुनप्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहे. पोलिस तपासात आरोपी पत्नीने प्रियकराच्या मदतीने नकुलचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, पोलिसांनी बुधवारी (दि. २९) प्रियकराला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपी पत्नीसह दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Latest Pimpri chinchwad News)
नकुल आनंदा भोईर (४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) असे खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी चैताली भोईर आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दिपक पवार (२१, रा. बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२५ रोजी नकुल भोईर यांचा खून करण्यात आला. त्यांची पत्नी चैत्राली हिने आपण एकटीने खून केल्याची माहिती पोलिसांना फोन करून दिली. त्यानुसार, पोलिसांनी तिला अटक केली. मात्र या प्रकरणात आणखी कोणीतरी सहभागी असावे, अशी शंका पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, त्या दोघांनीही पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. अखेर पोलिसांनी विविध फंडे वापरून आरोपी गुन्ह्याची उकल केली.
आरोपी सिद्धार्थ पवार हिचे आरोपी चैतालीशी अनैतिक संबंध होते. या संबंधाच्या कारणावरून नकुल भोईर आणि पत्नी चैत्राली भोईर यांच्यात वादविवाद होत होते. आपल्या अनैतिक संबंधाच्या आड नकुल भोईर येत असल्याने त्या दोघांनीही नकुलचा काटा काढण्याचे ठरविले. त्यातच चैत्राली हिने अनेकांकडून कर्ज घेतल्याची माहितीही नकुल यांना समजली. त्या कारणावरून चैत्राली व नकुल यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी नकुलने पत्नीला मारहाण केली. आपल्या प्रेयसीला मारहाण झाल्याने सिद्धार्थ याचा राग अनावर झाला आणि दोघांनी संगनमताने ओढणीच्या साह्याने नकुलचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
चैत्राली हिने आपणच नकुल याचा गळा आवळला असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र तपासात हे कृत्य चैत्राली आणि सिद्धार्थ या दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले. ज्या ओढणीने नकुल यांचा गळा आवळला ती ओढणी सिद्धार्थ हा जाळून टाकणार होता. कारण त्या ओढणीला नकुल याचा घाम होता. मात्र चैत्राली हिने दुसरीच ओढणी पोलिसांना दाखविली. ज्या ओढणीने खून केला ती ओढणी लपवून ठेवली. आता तीच ओढणी जप्त करण्यासाठी चैत्राली हिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी सिद्धार्थ आणि चैत्राली यांचे प्रेमसंबंध होते. ते कोणकोणत्या लॉजवर गेले याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. मात्र हे कागदी पुरावे असल्याचे त्यासाठी आरोपी सिद्धार्थ याच्या पोलीस कोठडीची गरज नाही. तसेच पोलीस चौकशीसाठी आरोपीला वारंवार पोलीस ठाण्यात बोलवत असल्याने पोलिसांना सर्व माहिती आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नसल्याचे आरोपीचे वकील ॲड. सुनील कडूस्कर यांनी सांगितले. तर आरोपी सिद्धार्थ याच्या रक्ताचे नमुने घ्यायचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
कोण होते नकुल भोईर
नकुल भोईर हे चिंचवड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते. सामाजिक कार्याशिवाय विविध संघटनांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनाने परिसरात तसेच सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्यात अधूनमधून वाद होत असले तरी हा प्रकार इतक्या टोकाला जाईल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.