

गणेश विनोदे
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका भाजप व राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची चिन्हे दिसत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उबाठा पक्ष, मनसे आणि वंचित आघाडी यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची घोषणा केली. परंतु, विधानसभा निवडणुकी वेळी याच महाविकास आघाडीत स्थानिक भाजपचा समावेश असताना काहीच साध्य झाले नाही.(Latest Pimpri chinchwad News)
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी तसेच लोणावळा व तळेगाव दाभाडे नगर परिषद, वडगाव मावळ नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी येत्या दोन महिन्यांत निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रामुख्याने भाजप व राष्ट्रवादीमध्ये चांगलीच धुसफूस सुरू आहे.
दरम्यान, आज काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे आणि वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे जाहीर केले.
वास्तविक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील शेळके व महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यात सरळ लढत झाली. त्या वेळी शेळके यांच्या मागे भाजपचे ठराविक पदाधिकारी महायुती म्हणून ठामपणे उभे राहिले. उर्वरित भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या मागे खंबीरपणे उभे होते.
एकंदर, विधानसभा निवडणुकीत महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे पारडे कितीतरी पटीने जड दिसत असताना महायुतीचे उमेदवार सुनील शेळके हे तब्बल एक लाख दहा हजारांच्या विक्रमी मताधिक्यांनी विजयी झाले. त्यावेळी मोजके पदाधिकारी वगळता संपूर्ण भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उबाठा पक्ष हे महाविकास आघाडीत एकत्र असताना शेळके यांना इतके मोठे मताधिक्य मिळाले. आतातर भाजपा स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. मग त्यावेळच्या महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्षच या आघाडीत नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारेल याविषयी मावळ परिसरात चर्चांचे फड रंगू लागले आहेत.