

पिंपरी: भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आणि माझे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडे अनुप मोरे याने दुसऱ्या एका मुलीसोबत संबंध सुरू केले असून ते मला धमकावत आहे, अशी तक्रार भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने चिंचवड पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. (Latest Pimpri chinchwad News)
महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अनुप मोरे यांनी त्यांचे एकत्रित फोटो आणि व्हिडीओ इतर मुलीला दाखवू नयेत, यासाठी धमकावले आहे. दरम्यान, रविवारी (दि. २६) सायंकाळी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाजवळ महिला पदाधिकारी त्यांच्या वाहनात असताना दोन अज्ञात इसमांनी दगडफेक करून त्यांच्या कारची मागील काच फोडली. अनुप मोरे यांच्या सांगण्यावरून माझ्या वाहनावर दगडफेक केल्याचा आरोप देखील महिलेकडून करण्यात आला आहे.
या तक्रारीमुळे भाजपच्या स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षावरच पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांशी गैरवर्तनाचे आणि धमकीचे आरोप झाल्याने पक्षात आतल्या गोटात चांगलीच कुजबुज सुरू आहे. काही कार्यकर्त्यांनी या प्रकारामुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे मत व्यक्त केले आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मी कोणत्याही महिलेला धमकी दिली नाही. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून मला संपवण्याचे राजकीय षडयंत्र सुरू आहे.
अनुप मोरे, प्रदेशाध्यक्ष, युवा मोर्चा, भाजप.