पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशीतील डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळून दुर्घटना घडली. त्या 8 जुलैच्या दुर्घटनेपासून मोशी कचरा डेपोत कचरा टाकणे बंद आहे. संपूर्ण शहरातील कचरा संकलनाचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे कचरा हस्तांतरण व विलगीकरण केंद्र परिसरात कचराचे ढीग भरून वाहत आहेत. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा डेपोत कचरा जमा करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा घंटागाडीद्वारे जमा केला जातो. तो कचरा कचरा हस्तांतरण केंद्रात घंटागाडीत नेऊ त कॅप्सूल वाहनात टाकला जातो. तेथून तो कचरा मोशी डेपोत नेऊन टाकला जातो. त्याचप्रमाणे हाऊसिंग सोसायट्यांतील कचरा कॉम्पेक्टरद्वारे जमा केला जातो. ते काम शहराचे दक्षिण व उत्तर विभागानुसार दोन ठेकेदारांमार्फत केले जात आहे. त्याद्वारे दररोज 1 हजार 500 टन कचरा मोशी डेपोत टाकला जातो. मात्र, वेस्ट टू एनर्जीची प्रशासकीय इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्य रविवारी पहाटेपर्यंत सुरू होते. त्यामुळे डेपोतील रस्ता बंद आहे. कचर्याच्या वाहनांना तेथे जाता येत नाही.
त्यामुळे संपूर्ण शहराचे कचरा संकलनाचे करण्याचे नियोजन 9 जुलैपासून विस्कळीत झाले आहे. कचरा हस्तांतरण केंद्र आणि विलगीकरण केंद्रात तात्पुरता कचरा जमा करण्यात येत आहे. त्या भागात मोठ्या प्रमाणात कचर्याचे ढीग तयार झाले आहेत. तसेच, उघड्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. शहरात 6 जुलैला नद्यांना पूर आला होता. त्यामुळे अनेक घरे, हाऊसिंग सोसायट्या, बंगले, दुकाने, कार्यालये, आस्थापनांत पाणी शिरले. पाण्यामुळे खराब झालेले साहित्य बंद पडलेली वाहने आदी साहित्य तसेच, चिखल व घाण रस्त्याच्याकडेला पडून आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यावरून नागरिकांसह नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या निगडी डेपोत कचरा टाकण्यास सुरुवात
मोशी कचरा डेपोत झालेल्या दुर्घटनेमुळे तेथे कचरा वाहनांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये कचरा साठविण्यात येत आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कासारवाडीतील शंकरवाडी येथील कचरा डेपोची जागाचा पर्याय शोधण्यात आला होता. मात्र, तेथील जमिनी भुसभुशीत असल्याने तेथे कचरा वाहनांची ये-जा करता येत नाही. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निगडी येथील जुन्या कचरा डेपोची जागेत कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
डेपोतील रस्ते लवकरच मोकळे करणार :
मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेचे बचाव कार्य थांबवण्यात आले आहेत. तेथील राडारोडा हटविण्यात येत आहे. तसेच, रस्ते मोकळे करण्यात येत आहेत. त्यानंतर कचरा वाहतूक वाहनांना डेपोत प्रवेश दिला जाईल, असे महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
‘संबंधितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेत नऊ कर्मचार्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दुघटनेस जबाबदार असलेले महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी तसेच, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे ठेकेदार अॅन्टोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करावा. तसे न झाल्यास नागरिकांकडून महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे. मोशी दुर्घटनेप्रकरणी महापालिका भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक नीलेश बारणे, नीलेश तरस आदी उपस्थित होते.