Spine Road Traffic Pudhari
पिंपरी चिंचवड

Spine Road Traffic Problem: मोशी स्पाईन रोडवर वाहतूक कोंडी गंभीर; अनधिकृत पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

सेवा रस्त्यावर अतिक्रमण आणि पार्किंगमुळे रुग्णवाहिका व पादचाऱ्यांना मोठा त्रास; नागरिकांची कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मोशी: पिंपरी-चिंचवड शहरातील स्पाईन रोडवरील स्वामी विवेकानंद भुयारी मार्ग ते चेरी चौक या दरम्यानच्या सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. या सेवा रस्त्याच्या बाजूला विविध व्यावसायिकांची दुकाने, रुग्णालये आहेत परंतु त्यांच्याकडे पार्किंगची व्यवस्था नसल्याने बहुतांश ग्राहक व पेशंटचे नातेवाईक रस्त्यात वाहने पार्क करून जात असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

या भागात महापालिकेच्या वतीने खाऊ गल्ली उभारण्यात आली आहे. तसेच पदपथांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे पादचार्यांना देखील मुख्य रस्त्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सेवा रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याने व अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांना दररोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. परंतु संंबंधित वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना नहाक त्रास सहन करावा लागत आहे.

रुग्णवाहिका, पादचाऱ्यांची होतेय गैरसोय

विशेषतः रुग्णवाहिका, वृद्ध नागरिक आणि शाळकरी मुलांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला असून, अनेकदा किरकोळ अपघात घडण्याचे प्रमाणही वाढले आहे. या परिसरातील एका नागरिकाने सांगितले की, त्यांनी या संदर्भात ट्रॅफिक पोलिसांनाही सूचित केले आहे, परंतु कारवाई अभावी ही परिस्थिती कायम आहे. अनेकदा स्वामी विवेकानंद भुयारी मार्गाजवळ तसेच चेरी चौकात वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी होते. यामुळे पादचारी व रुग्णवाहिकेला मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पदपथांवर अतिक्रमण

रस्त्याच्या बाजूला सर्रासपणे गाड्या लावल्या जात असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच घरकुल चौकातील सेवा रस्त्याच्या पदपथावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. हे व्यावसायिक पदपथावर आपली दुकाने थाटत असल्याने पादचारी नागरिकांना रहदारीच्या मार्गावर प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिक प्रशासनाला वारंवार विनंती करूनही यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाने तातडीने अनधिकृत पार्किंग हटवावे आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी.

संबंधित भागाची पाहणी केली जाईल. या भागात सेवा रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने पार्क केलेली आढळून आली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
रामचंद्र घाडगे, वाहतूक पोलिस निरीक्षक, निगडी
स्पाईन रोडच्या सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे आणि बेशिस्तपणे वाहने उभा केलेली असतात. यामुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, पोलिस विभागाने तातडीने अशा वाहनांवर कारवाई करावी.
नीलेश नेवाळे, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT