पिंपरी: मोशी कचरा डेपो येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला होता. बुधवारी (दि. ८) झालेल्या दुर्घटनेतील शेवटचा मृतदेह शनिवारी रात्री एकच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तब्बल ८४ तास सुरू असलेले बचावकार्य अखेर समाप्त करण्यात आले. या दुर्घटनेत एकूण नऊ कामगारांचा मृत्यू झाला असून, नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, भारतीय सैन्य, महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांनी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवली. सुरुवातीच्या काही तासांत नऊ कामगारांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. मात्र, इमारतीवर कोसळलेल्या हजारो टन कचऱ्यामुळे आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या काँक्रीटच्या स्लॅबमुळे उर्वरित कामगारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. सलग ८४ तास जेसीबी, पोकलेन, क्रेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कचरा हटविण्यात आला.
प्रत्येक थर हटविताना आणखी कचरा घसरण्याचा धोका असल्याने बचावकार्य अत्यंत सावधगिरीने करावे लागले. शनिवारी (दि. ११) दिवसभरात सात मृतदेह बाहेर काढल्यानंतर शेवटचे बेपत्ता असलेल्या वामन कसबे (५०, रा. मोशी) यांचाही मृतदेह रात्री सापडल्याने बचावकार्याची सांगता करण्यात आली. या दुर्घटनेत भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांचा मृत्यू झाला आहे. तर, सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह, विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
घटनास्थळी कुटुंबीयांची गर्दी
दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सलग सुरू असलेल्या बचाव मोहिमेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. अखेर सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर प्रशासनाने बचावकार्य थांबविले असून, आता दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास आणि जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एनडीआरएफच्या ९० जवानांचे शर्थीचे प्रयत्न
बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन पथकांतील सुमारे ९० जवान घटनास्थळी दाखल झाले होते. जवानांनी महापालिकेचे अग्निशमन दल, भारतीय सैन्य, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांसह सलग ८४ तास युद्धपातळीवर बचावकार्य राबविले. हजारो टन कचरा आणि कोसळलेल्या इमारतीच्या मलब्यात अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक शोध उपकरणे, कटर, हायड्रॉलिक रेस्क्यू साधने आणि जड यंत्रसामग्रीच्या मदतीने अत्यंत सावधगिरीने मोहीम राबविण्यात आली.
मोशी कचरा डेपो येथे घडलेली घटना दुर्दैवी असून, यामध्ये ९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मनाला प्रचंड वेदना देणारी ही घटना आहे. यंत्रणांनी तब्बल ८४ तास सलग बचाव मोहीम राबविली. ९ नागरिकांना सुखरुप बाहेरदेखील काढले. मात्र, ९ नागरिकांचा झालेला अंत मन हेलावून टाकणारा आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असून, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका