Moshi Accident Relatives Protest: ‘आमची माणसं जिवंत आहेत का?’; मोशी कचरा डेपोबाहेर चार दिवसांनी नातेवाईकांचा संयम सुटला

बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयांचा आक्रोश; माहिती न मिळाल्याने संताप, रुग्णवाहिका अडवण्याचा प्रयत्न, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
Moshi Accident Relatives Protest
Moshi Accident Relatives ProtestPudhari
Published on
Updated on

पिंपरी: चार दिवस झाले आम्ही उपाशी-तापाशी गेट बाहेर बसून आहोत. आमची माणसं जिवंत आहेत की, नाही हे तरी सांगा. आम्हाला रस्त्याच्या बाजूला बसवून ठेवलं आहे, खाण्या-पिण्याची सोडा.. पण आमच्या माणसांबाबत काही सांगतही नाहीत, आत काय सुरू आहे.. अशा आर्ततेने संबंधितांवर प्रश्नांची सरबत्ती करत होते. दुर्घटनास्थळी गेले चार दिवस तहान-भूक विसरून तेथे थांबलेल्या नातेवाईकांच्या संयमाचा बांध फुटला.

Moshi Accident Relatives Protest
Akurdi Warkari Bhavan: आकुर्डीतील वारकरी भवन २० वर्षांपासून कागदावरच; आषाढी वारीत पुन्हा वारकऱ्यांच्या गैरसोयीचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी-चिंचवड मोशी येथील कचरा डेपोमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर तब्बल चार दिवस उलटून गेले, तरी आतमध्ये नेमके काय सुरू आहे, बेपत्ता कर्मचार्‍यांची स्थिती काय आहे आणि शोधकार्य कुठपर्यंत पोहोचले आहे, याबाबत स्पष्ट माहिती न मिळाल्याने नातेवाईक संतप्त झाले होते. उपाशीपोटी डेपोबाहेर बसलेल्या कुटुंबीयांचा आक्रोश शनिवारी तीव्र स्वरूपात बाहेर पडला. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी, अश्रू, संताप आणि दगडफेक अशा घटनांमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होते.

Moshi Accident Relatives Protest
Moshi Accident Inquiry: मोशी कचरा डेपो दुर्घटनेची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी; दोषींवर कारवाई करणार - आयुक्त सूर्यवंशी

चार दिवसांची प्रतीक्षा... पण उत्तर शून्य

बुधवारी (दि. ८) दुर्घटना घडल्यानंतर शनिवार (दि. ११) चार दिवस पूर्ण झाले. या काळात नातेवाईक डेपोच्या बाहेरच ठाण मांडून बसले होते.

संवादाऐवजी शांत राहण्याचा सल्ला?

डेपोबाहेर पोलिस आणि महापालिका अधिकारी वेळोवेळी नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, संतप्त कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांना प्रत्यक्ष माहिती मिळत नव्हती. त्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी केवळ संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. चार दिवसांपासून अनिश्चिततेच्या गर्तेत जगणार्‍या कुटुंबीयांचा मानसिक ताण टोकाला पोहोचला आणि अखेर त्याचा उद्रेक झाला.

Moshi Accident Relatives Protest
Sunetra Pawar: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणार; सुनेत्रा पवारांनी दिले मृतांच्या कुटुंबीयांना आश्वासन

रुग्णवाहिका अडविण्याचा निर्णय; प्रत्येकाची ओळख सांगण्याची मागणी

अखेर संतप्त नातेवाईकांनी डेपोमधून बाहेर पडणारी कोणतीही रुग्णवाहिका थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यामागे त्यांची एकच भूमिका होती-रुग्णवाहिकेत कोणाला घेऊन जात आहेत, त्याचे नाव आम्हाला कळले पाहिजे. रुग्णवाहिका वेगाने बाहेर जात असल्याने त्यामध्ये कोण आहे, याची माहिती मिळत नसल्यामुळे संशय आणि अस्वस्थता वाढत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पोलिसांनी प्रत्येक रुग्णवाहिकेबाबत शक्य तितकी माहिती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती शांत झाली होती.

मानवी वेदनेसमोर यंत्रणा अपुरी?

दुर्घटनेनंतर बचावकार्य जितके महत्त्वाचे असते, तितकेच महत्त्वाचे असते ते नातेवाईकांशी सातत्याने संवाद ठेवणे. चार दिवस अनिश्चिततेच्या गर्तेत बसलेल्या कुटुंबीयांचा मानसिक ताण वाढत गेला आणि अखेर त्याचे रूप संतापात बदलले. प्रशासनाविरोधातील घोषणाबाजी ही केवळ रोषाची प्रतिक्रिया नसून माहिती, संवाद आणि संवेदनशीलतेची मागणी असल्याचे चित्र डेपोबाहेर पाहायला मिळाले.

कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दाबला गेला काळजाचा तुकडा!

गेल्या चार दिवसांपासून डोळ्यांतील अश्रू सुकले आहेत, घशाची कोरड तशीच आहे... माझा माणूस जिवंत असेल का? या एकाच आशेवर, उपाशीपोटी आणि तहान विसरून कचरा डेपोच्या ढिगाऱ्याबाहेर ठिय्या मांडून बसलेल्या नातेवाईकांच्या संयमाचा आज अखेर कडेलोट झाला. पालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे कचऱ्याचा संपूर्ण डोंगर इमारतीवर कोसळला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. हलगर्जीपणाच्या या ढिगाऱ्याखाली अनेक निष्पाप जीव गाडले गेले आणि त्याचसोबत शेकडो संसार उद्ध्वस्त झाले. आज याच भीषण वास्तवाचा सामना करताना दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांचा आक्रोश छाती फाडणारा होता.

Moshi Accident Relatives Protest
Moshi Garbage Depot Illegal Construction: मोशी कचरा डेपोतील प्रशासकीय इमारतच अनधिकृत?; तळमजल्याची परवानगी, मात्र उभारले दोन मजले

कार्यकर्त्यांची मध्यस्थी, अखेर रुग्णवाहिकेला वाट

आमच्या माणसांचे मृतदेह आम्ही घेऊन जाऊ देणार नाही, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही, अशी भूमिका घेत नातेवाईकांनी मृतदेह नेणारी रुग्णवाहिका अडवून धरली. शेवटी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढे होऊन नागरिकांची समजूत काढली, त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि धीर दिला. कार्यकर्त्यांनी विनंती केल्यानंतर अत्यंत जड अंतःकरणाने आणि हुंदके देत नागरिकांनी रुग्णवाहिकेला जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली.

'हा अपघात नाही, पालिकेने केलेला खूनच!

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही या कचऱ्याच्या डोंगराकडे दुर्लक्ष करण्यात आले. हा अपघात नाही, तर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेला निष्पापांचा खून आहे, असा थेट आणि गंभीर आरोप हतबल झालेल्या नातेवाईकांनी केला आहे. कचऱ्याच्या साम्राज्याने आज अनेकांचे आयुष्य कायमचे संपवले आहे. या निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार का? की गरिबांच्या जीवाचे मोल प्रशासनाच्या लेखी शून्यच राहणार? हाच आक्रमक प्रश्न आज या ढिगाऱ्यासमोर उभा आहे.

पोलिसांच्याही डोळ्यांत पाणी

​​नागरिकांचा रोष इतका तीव्र होता की, कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांनाही नातेवाईकांचा हा आक्रोश आवरणे कठीण झाले होते. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसोबत संतप्त नागरिकांची मोठी हुज्जत झाली. मात्र, जेव्हा एका आईने, एका भावाने, आईने बहिणीने एका बापाने आपल्या मुलासाठी फोडलेला हंबरडा समोर आला, तेव्हा दगडफेक रोखण्यासाठी उभ्या असलेल्या खाकी वर्दीतील पोलिसांचेही हात थरथरले आणि त्यांच्याही डोळ्यांत पाणी तरळले. तो आक्रोश इतका जीवघेणा होता की, संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news