

संतोष शिंदे
पिंपरी: उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये औद्योगिक आणि पायाभूत विकासाचा वेग वाढत असताना कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात मागील वर्षभरात तब्बल २ हजार ४०८ अकस्मात मृत्यूंची नोंद झाली असून, सरासरी दररोज सहा ते सात जणांचा विविध कारणांनी मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील नऊ मृत्यू, फुगेवाडीतील विषारी दारूकांडातील शहरातील १६ बळी तसेच उद्योग आणि बांधकाम क्षेत्रातील सातत्याने घडणाऱ्या दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
भोसरी, चाकण, तळेगाव, पिंपरी एमआयडीसी तसेच हिंजवडी आणि तळवडे आयटी हबमध्ये लाखो कामगार, कर्मचारी आणि कंत्राटी मजूर कार्यरत आहेत. वाहन उद्योग, अभियांत्रिकी, रसायन, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम आणि सेवा क्षेत्राच्या विस्तारामुळे राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार शहरात येतात. शहराच्या विकासाचा कणा असलेल्या या कामगारांनाच विविध दुर्घटनांमध्ये जीव गमवावा लागत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे.
मोशी दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू
मोशी कचरा डेपो येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. तब्बल ८४ तासांच्या बचावकार्यानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेने कचरा व्यवस्थापन प्रकल्पांतील सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्याआधी फुगेवाडीतील विषारी हातभट्टी दारूकांडात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी १६ जण पिंपरी-चिंचवडमधील होते.
मागील वर्षात २ हजार ४०८ मृत्यूंची नोंद
शहरातील बांधकाम प्रकल्पांवर उंचावरून पडणे, भिंत किंवा स्लॅब कोसळणे, क्रेन अथवा यंत्रसामग्रीचा फटका बसणे, विजेचा धक्का लागणे अशा दुर्घटनांमध्ये दरवर्षी कामगारांचा मृत्यू होत आहे. औद्योगिक क्षेत्रात गॅसगळती, रासायनिक दुर्घटना, यंत्रांमध्ये अडकणे आणि बॉयलर स्फोट यासारख्या घटनांमुळेही जीवितहानी होत असते. प्रत्येक दुर्घटनेनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होतात. मात्र, अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही. याशिवाय रस्ते आणि रेल्वे अपघात, बुडणे, आत्महत्या तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळणारे बेवारस मृतदेह यामुळेही अकस्मात मृत्यूंच्या संख्येत भर पडत आहे. मागील वर्षातील २ हजार ४०८ अकस्मात मृत्यूंची नोंद शहरातील सुरक्षिततेबाबत चिंताजनक चित्र अधोरेखित करते. औद्योगिक प्रगतीबरोबरच कामगारांच्या सुरक्षिततेला समान प्राधान्य देणे, सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आणि दुर्घटनांनंतर तातडीने मदत व नुकसानभरपाईची प्रभावी यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे.
अकस्मात मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनाची प्रक्रिया केली जाते. मृत्यूचे नेमके कारण तपासून त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाते. अनेक प्रकरणांत मृत व्यक्ती स्थलांतरित कामगार असल्याने त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेणे, ओळख पटविणे आणि मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरते.
सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
मोठ्या उद्योगांमध्ये सुरक्षा व्यवस्था तुलनेने सक्षम असली तरी अनेक लघुउद्योग आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत नाही. कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य, नियमित प्रशिक्षण आणि यंत्रसामग्रीची तपासणी बंधनकारक केली तर अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकते.
काशिनाथ नखाते, कामगारनेते, पिंपरी-चिंचवड