

पिंपरी: मोशी येथील दुर्घटनास्थळी विविध शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे समन्वय साधत सलग शोध व बचाव मोहीम राबविली. एनडीआरएफ, मेस्को, सुरक्षा विभाग, अग्निशामक दलाचे जवान, महाराष्ट्र पोलीस, दंगल नियंत्रण पथक, आरसीपी, पोलिसांनी घटनास्थळी गेले चार दिवस सलगपणे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत होते.
दुर्घटनास्थळी गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, परिसर सुरक्षित ठेवणे आणि बचाव पथकांना अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले. तर दलाच्या जवानांनी अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने लोखंडी बीम कापणे, अडथळे दूर करणे आणि ढिगाऱ्यातील मार्ग मोकळा करण्याचे काम केले.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) जवानांनी इमारतीचा आराखडा (Building Plan), संरचनेची माहिती आणि उपलब्ध साहित्याचा अभ्यास करून नियोजनबद्ध पद्धतीने शोधमोहीम राबविली. जड अवशेष हटविताना प्रत्येक टप्प्यावर सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. आवश्यक तेथे अग्निशामक दलाच्या उपकरणांची मदत घेत बचावकार्य अधिक वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सलग अनेक तास विविध यंत्रणांनी समन्वय राखत जीव धोक्यात घालून शोधमोहीम सुरू ठेवली. प्रत्येक यंत्रणेने आपापली जबाबदारी पार पाडत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
दरम्यान, अद्याप एका व्यक्तीचा शोध सुरू असून, एनडीआरएफ, अग्निशामक दल, महापालिका आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त शोधमोहीम रात्रभर सुरू आहे. उर्वरित व्यक्तीचा शोध लागेपर्यंत बचावकार्य थांबविण्यात येणार नसल्याचे संबंधित यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दुर्घटनास्थळी पोहोचताच आम्ही सर्वप्रथम इमारतीच्या संरचनेचा आणि बिल्डिंग प्लॅनचा अभ्यास केला. ढिगाऱ्याखालील परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक टप्प्याचे नियोजन करण्यात आले. जड लोखंडी बीम आणि काँक्रीटचे अवशेष हटविताना अग्निशामक दलाच्या अत्याधुनिक उपकरणांची मदत घेतली. प्रत्येक हालचाल अत्यंत सावधगिरीने करण्यात आली, कारण बचाव पथकांच्या सुरक्षिततेसोबत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीपर्यंत शक्य तितक्या लवकर पोहोचणे हे आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते.
अशोक कुमार, डेप्युटी कमांडंट, NDRF
एनडीआरएफच्या समन्वयाने आमच्या जवानांनी रेस्क्यू कटर, ब्रेकर आणि इतर हायड्रॉलिक उपकरणांच्या सहाय्याने लोखंडी बीम कापून ढिगाऱ्यात सुरक्षित मार्ग तयार केला. जड अवशेष हटविण्यापासून ते प्रत्येक टप्प्यावर आवश्यक तांत्रिक मदत पुरविण्यापर्यंत अग्निशामक दलाचे जवान सातत्याने कार्यरत होते. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असल्याने सर्व यंत्रणांनी एकदिलाने आणि जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू ठेवले.
गौतम इंगवले सब ॲाफिसर अग्निशमन
बचावकार्यात आवश्यक ती सर्व मदत पुरविण्यात आली. जड अवशेष हटविणे, यंत्रसामग्रीचे नियोजन, बचाव पथकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे आणि घटनास्थळी सुरक्षेची काळजी घेणे, या सर्व कामांमध्ये आमचे कर्मचारी सातत्याने कार्यरत होते. शेवटच्या व्यक्तीचा शोध लागेपर्यंत ही मोहीम पूर्ण क्षमतेने सुरू राहील.
एकनाथ बगाटे मेस्को सुपरवाइझर