Moshi Garbage Depot Accident: चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आक्रोशाचा बांध फुटला; आठ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

नातेवाईकांचा प्रशासनावर संताप; ‘वेळीच वेगाने बचावकार्य झाले असते तर जीव वाचले असते’चा आरोप
Moshi Accident
Moshi AccidentPudhari
Published on
Updated on

वल्लभनगर: मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर घटनास्थळी शनिवारी पीडितांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. बचावकार्य संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत काही नातेवाईकांची पोलिसांशी बाचाबाची झाली. या वेळी पोलिसांनी उपस्थितांना अफवा पसरवू नका, तसेच कोणतेही चुकीचे संदेश सोशल मीडियावर प्रसारित करू नका, असे आवाहन केले.

Moshi Accident
Moshi Garbage Depot Rescue Operation: मोशी दुर्घटनेत बचाव पथकांची चार दिवसांची अथक मोहीम; एनडीआरएफसह विविध यंत्रणांचा जीव धोक्यात घालून शोधकार्य

पीडितांच्या नातेवाईकांनी बचावकार्यात अधिक यंत्रसामग्री वापरली नसल्याचा आरोप केला. कुदळवाडी येथील अतिक्रमण हटवण्यासाठी ४० ते ५० जेसीबी वापरल्या जातात. मात्र, कचऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी केवळ चार ते पाच जेसीबी लावण्यात आल्या. अधिक जेसीबी लावल्या असत्या तर माझा मुलगा जिवंत राहिला असता, अशी हळहळ एका महिलेने व्यक्त केली. माझं लेकरू चार दिवसांपासून अन्न-पाण्याविना कचऱ्याखाली अडकले आहे, असे सांगताना ती भावूक झाली.

Moshi Accident
Moshi Accident Relatives Protest: ‘आमची माणसं जिवंत आहेत का?’; मोशी कचरा डेपोबाहेर चार दिवसांनी नातेवाईकांचा संयम सुटला

दुसऱ्या एका महिलेने माझे जावई चार दिवसांपासून आत अडकले आहेत. आम्हाला गेटच्या आतही जाऊ दिले जात नाही. आम्ही काय करावे, हे शासनानेच सांगावे अशी व्यथा मांडली. घटनास्थळी उपस्थित काही नातेवाईकांमध्ये भोसरी-चाकण मार्ग रोखण्याबाबत चर्चा सुरू होती. एखादा प्रतिष्ठित किंवा श्रीमंत व्यक्ती अडकला असता तर त्याला तातडीने बाहेर काढले गेले असते. आम्हाला आमचा मुलगा सुरक्षित हवा आहे. अशा भावना संतप्त नातेवाईकांनी व्यक्त केल्या.

लग्न होऊन केवळ महिनाच...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या वाहनचालक अक्षय सावंत याचा मृतदेह अखेर सापडला. अक्षयला नोकरीला लागून अवघा महिनाच झाला होता. लग्नाला दोन महिने पूर्ण झाले होते. दुर्घटनेदिवशी सकाळी अक्षयने पत्नी हर्षदाला जेवायला बसलो आहे, असा फोन केला. आणि त्यानंतर त्याचा फोन नॉटरिचेबल लागला. त्यामुळे हर्षदाला काहीतरी अघटीत घडलं असल्याचं वाटल्याने तिने नातेवाईकांना कळवले. त्यानंतर दुपारी मोशी दुर्घटनेबद्दलची बातमी आली. गेल्या चार दिवसांपासून कुटुंबीय त्यांच्या परतण्याची वाट बघत होते. अखेर चार दिवसांनंतर अक्षयचा मृतदेह सापडला. नवीन नोकरी आणि नवीन संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या अक्षयच्या जाण्याने हर्षदा आणि कुटुंबावर आभाळच कोसळले आहे. कॅन्टीनमध्ये जेवायला गेला आणि काळाने घाला घातला.

Moshi Accident
Akurdi Warkari Bhavan: आकुर्डीतील वारकरी भवन २० वर्षांपासून कागदावरच; आषाढी वारीत पुन्हा वारकऱ्यांच्या गैरसोयीचा प्रश्न ऐरणीवर

कॅन्टीनमध्ये जेवायला गेल्यावर काळाची झडप

सनी माने देखील मोशी कचरा डेपोमध्ये ड्रायव्हरचं काम करत होता. जवळच घर असल्याने रोज जेवायला घरी येणे किंवा गाडीतच बसून डबा खात असे. त्यादिवशी कंपनीच्या अधिकाऱ्याने कॅन्टीनमध्ये जेव असे म्हणून त्याच्यासोबत कॅन्टीनमध्ये जेवायला नेले. आणि त्यांच्यावर काळाने झडप घातली. सनीला एक आठ वर्षाचा आणि तीन वर्षाचा मुलगा आहे. पत्नी कांचन त्या दिवशी म्हणाली घरी बिर्याणी करत आहे, घरी जेवण करून जा; पण कामाला उशीर होईल म्हणून तो लगेचच कामाच्या ठिकाणी गेला. जेवण केल्यानंतर चेंज पण करायचे होते. त्या वेळी अचानकच कचऱ्याचा डोंगर कोसळला आणि सनी त्याच्यामध्ये चार दिवस अडकला. नातेवाईक जिवंत असल्याची वाट बघत होते पण शेवटी त्याचा मृतदेह सापडला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

चिमुकल्याच्या येण्याने घरात आनंदी वातावरण

सुनील कोरके मोशी कचरा डेपोमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होते. दहा वर्षानंतर त्यांच्या घरात एका चिमुकल्याचे आगमन झाले होते. दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर चिमुकल्याच्या येण्याने घरात आनंदी वातावरण होते. सुनील कोरके हे दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवशी सुटी घेतात, पण यंदा काही कारणामुळे सुटी घेणे शक्य नाही झाले आणि ते कामावर गेले. दुपारी कॅन्टीनमध्ये जेवायला गेले असता फक्त हात धुतले आणि जेवायला बसणार तोपर्यंत ही दुर्घटना घडली असे त्यांच्या मावस भावाने सांगितले.

Moshi Accident
Moshi Accident Inquiry: मोशी कचरा डेपो दुर्घटनेची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी; दोषींवर कारवाई करणार - आयुक्त सूर्यवंशी

दोन आठवड्यांपूर्वीच विवाहबद्ध

महेश सुरेश कुंभार ( वय ३३, रा. आदर्श नगर, मोशी). कुंभार कुटुंबीय हे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. हे एचआर विभागामध्ये एक्झिटिव्ह म्हणून गेल्या सव्वा वर्षापासून प्रकल्पामध्ये कामाला होते. त्यांचे अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी (२२ जून) गावाकडे विवाह झाला होता. त्यांच्या मागे वडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. घटना घडली त्यादिवशी घटनेतून सुखरूप बसवलेले दादासाहेब आरसे यांनी महेश यांच्या भावाला या घटनेची माहिती दिली. तो आपला मित्रांसमवेत भाड्या तत्वावर राहत होता. दरम्यान, त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे कचऱ्यामुळे ही नोकरी सोडण्याचा विचार त्यांनी केला होता. तर, कायमस्वरूपी आपल्या गावी म्हणजेच छत्रपती संभाजी नगरला राहायला जाण्याचा निर्णयदेखील घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला.

कुटुंबातील कर्ता गेला

नागेश सर्जेराव गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर मोशी) यांचे मुळगाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आमले वायगाव. त्यांच्या पाठीमागे दोन मुली आहेत. तीन वर्षापूर्वी ते या प्रकल्पामध्ये नोकरीला कामाला होते. गायकवाड कुटुंबामध्ये एकटेच कमवती असल्याने. त्यावरती उदरनिर्वाह होत होता. त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरी मिळावी, अशी मागणी त्यांचे भाऊ शुभम गायकवाड यांनी केली आहे. कुदळवाडी येथे अतिक्रमण कारवाई करताना महापालिकेने यंत्रणा राबवली होती. तशी यंत्रणा या पाचोरामध्ये का राबवली गेली नाही, असा सवाल देखील शुभम यांनी केला आहे.

..तर जीव वाचवता आले असते!

मूळचा कराडचा रहिवासी असलेला रणजित जयवंत पाटील, गेल्या दीड वर्षांपासून डेपोमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करत होता. त्याचा चुलत भाऊ, श्रीतेज गुरव, बचाव कार्यावर टीका करणाऱ्यांमध्ये आघाडीवर होता. हे कार्य संथ गतीने, निष्काळजीपणाने आणि प्रशासकीय उदासीनतेने भरलेले असल्याचा आरोप त्याने केला. गुरव म्हणाला की, अवजड यंत्रसामग्री अडीच दिवसांनंतर आणण्यात आली, जी बुधवारीच तैनात करता आली असती. जलद प्रतिसाद मिळाला असता तर काही जीव वाचवता आले असते, असे त्याचे मत आहे. त्याने पुढे असाही आरोप केला की, कचरा कोसळण्याबाबत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेल्याने कंपनीचीही तितकीच जबाबदारी आहे. तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे (PCMC) उपलब्ध असलेली यंत्रसामग्रीसुद्धा मर्यादित असल्याचे त्याने निदर्शनास आणून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news