Mohan Bhagwat Rashtramandir Pune Pudhari
पिंपरी चिंचवड

Mohan Bhagwat Rashtramandir Pune: "राममंदिर झाले; आता राष्ट्रमंदिर!" डॉ. मोहन भागवत यांचे पुण्यातून मोठे आवाहन

"संपूर्ण समाज संघटित झाला तरच राष्ट्रवैभव संपन्न होईल"; संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात सरसंघचालकांचे प्रतिपादन; शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामींकडून हिंदू राष्ट्राच्या स्वप्नावर भर.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : ‘मंदिर उभारणे हेच आमुचे शील‌’, या उक्तीप्रमाणे राम मंदिर उभे राहिले. धर्मध्वजाने मंदिर पूर्णत्वाला गेले आहे. आता राष्ट्रमंदिरही अधिक वेगाने उभे करायचे आहे. संपूर्ण समाज संघटित झाला तरच राष्ट्रवैभव संपन्न होईल आणि विश्वाचे कल्याण होईल, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

आदित्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा सोहळा पार पडला. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले, परंपरेने मिळालेले अधिष्ठान हे शाश्वत सत्य आहे. सर्वांना मिळून चालायचे असेल तर धर्म आवश्यक आहे. सामूहिक जीवनाची धारणा जो करतो तो धर्म आहे. सगळ्यांचे एकत्रित हित साधणारा संतुलनाचा नियम म्हणजे धर्म असतो आणि धर्माची ताकद जगाला लक्षात येऊ लागली आहे. सत्याच्या आधारावर जीवन उभे करण्याचे महत्त्व जगाला समजावून सांगणे हे आपल्या राष्ट्राचे प्रयोजन आणि प्रबोधन आहे.

भारताच्या मोठेपणातून विश्वाचे मोठेपण झळकते. आपला विकास सर्वांच्या विकासाला कारणीभूत झाला पाहिजे. अन्यथा, विकास विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळेच संघटनेचे काम पूर्ण करणे हे वेळेचे आव्हान आणि काळाची मागणी आहे. शताब्दी वर्ष हा गौरवाचा तसेच आत्मपरिक्षणाचा विषय आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

याप्रसंगी ‌‘भारतीय उपासना‌’ या खंडाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. शंकर अभ्यंकर यांनी लिहिलेले कृतज्ञता पत्र, सरस्वती देवीचे मानचिन्ह आणि एक लाख रुपयांची गुरुदक्षिणा डॉ. मोहन भागवत यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. जीतेंद्र अभ्यंकर यांनी पत्राचे वाचन केले. आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले. आदित्य अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.

भारताच्या पंतप्रधानाना आता जगभरातील लोक ऐकतात. कारण, भारताची शक्ती जगाला समजली आहे. तुम्ही 30 वर्षे उशिरा का आलात, असे काही जण विचारतात. आम्ही पूर्वीपासून इथेच आहोत, तुम्हाला आता महत्त्व लक्षात आले, असे त्यांना सांगावे लागते.
डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक
संकल्प आणि प्रकल्पातून वैभवशाली समाजाचे स्वप्न पूर्ण होईल. काही काळापूर्वी बहुमताचे आणि स्थिर सरकार मिळेल का, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, भारतात संघाच्या सहाय्याने बहुमताचे सरकार आले आणि लोकशाही टिकून राहिली. पूर्वी ‌’यथा राजा, तथा प्रजा‌’ असे म्हटले जायचे. आता ‌‘यथा प्रजा, तथा राजा‌’, असा काळ आहे. त्यामुळे उत्तम व्यक्तीला बळ देणे हे संघाचे काम आहे. चांगल्या व्यक्तीला मतदानातूनही बळ मिळाले पाहिजे. इतर विषयांचा प्रचार होत असताना चांगल्या विचारांचा प्रचार अत्यंत आवश्यक आहे. आम्ही कोणाचाही तिरस्कार करत नाही, सर्वांचा पुरस्कारच करतो. राष्ट्रात धर्मही महत्त्वाचा आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. कारण, हिंदू धर्म सर्वांचा सन्मान करतो. हा धर्म कोणाच्याही विरोधात नाही. हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे.
शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT