वडगाव मावळ: भाजपकडे युतीचे प्रस्ताव दिले, परंतु त्यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचे सांगून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचे स्पष्ट करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत आमदार सुनील शेळके यांनी आज झालेल्या कार्यकर्ता व पदाधिकारी आढावा बैठकीत दिल्याने मावळात महायुतीत फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, दीपावली पाडव्याला उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करणार असल्याचे आमदार शेळके यांनी या वेळी जाहीर केले.(Latest Pimpri chinchwad News)
वडगाव मावळ येथे शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये झालेल्या या आढावा बैठकीत ते बोलत होते या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश आप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे, दीपक हुलावळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड, महिलाध्यक्ष सुवर्णा राऊत, युवकचे तालुकाध्यक्ष किशोर सातकर आदी उपस्थित होते.
आमदार शेळके यांनी या वेळी बोलताना भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांकडे स्थानिक नेत्यांकडे युतीचे प्रस्ताव युतीचे प्रस्ताव दिले होते. तळेगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपच्याच उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याचे घोषितही केले होते, परंतु भाजप नेत्यांनी हा प्रस्ताव स्वीकारण्याऐवजी त्यावर राजकारण सुरू केले. त्यामुळे आता युती झाली तर ठीक नाही, तर सर्व जागा स्वबळावर लढविल्या जातील, असे स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची एक मोठी संधी असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मावळ तालुक्याच्या वाड्या-पाड्यावर केलेली विकासकामे हीच आपली जादू आहे, बाकी दुसरी कुठलीही जादू नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, की या निवडणुकीत पैशाला महत्त्व न देता एखादा गरीब होतकरू कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी पक्षाने पुढाकार घ्यावा, ताकद द्यावी. निवडणूक ही पैशावरच होते हा गैरसमज काढून टाकावा, असेही आवाहन केले.
तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आरक्षणामुळे काही खुशी काही गम आहे, पण अजित पवार यांनी निष्ठेने काम करायचा निश्चय कार्यकर्त्यांचा आहे. प्रत्येकाला वाटते आपल्याला संधी मिळाले पाहिजे, त्यामुळे मत भिन्नता झाली तरी मन भिन्नता होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन करत पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून इतिहास घडवू असा विश्वास व्यक्त केला.
भाजपच्या त्या कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादीचे एक पाऊल मागे
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळत भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी खंबीरपणे साथ दिली त्या कार्यकर्त्यांपैकी कोणी उमेदवार म्हणून पुढे आले, तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी एक पाऊल मागे घेईल व उमेदवार देणार नाही, असेही स्पष्ट केले.
रवींद्र भेगडेंना होती भाजपची उमेदवारी? : आमदार सुनील शेळके
विधानसभा निवडणुकीत महायुतीत मावळची जागा राष्ट्रवादीला सुटली आणि मला उमेदवारी मिळाली, परंतु स्थानिक भाजपने विरोध केला, त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत मावळात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या असा निर्णय झाला व रवींद्र भेगडे यांना भाजपची उमेदवारी द्यायची असेही स्पष्ट केले, परंतु या बैठकीनंतर उलटेच घडले असा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी आज केला.