तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाचा कौल अजमावण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत (दि.17) प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह, पर्यायी (डमी), अपक्ष असे एकूण 138 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यात अपक्ष अर्जदारांची संख्या सर्वांधिक आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टीतर्फे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नगरसेवक पदासाठी एकूण अर्ज 133 तर नगराध्यक्ष पदासाठी 5 अर्ज आले आहेत. उद्या मंगळवारी प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे.
तळेगाव दाभाडे निवडणुकीसाठी युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पाहिल्यांदाच एकत्र आले आहेत. घड्याळ आणि कमळ या निवडणूक चिन्हांवर ते त्यांचे राजकीय नशीब अजमावणार आहेत. तर, दोन्ही पक्षातील नाराजांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र भरून आव्हान दिले आहे. अपक्ष उमेदवारांची एकूण संख्या जवळपास 100 आहे.
काही प्रभागांमधील जागांवर निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न युतीच्या धुरंधर नेत्यांकडून राहिला. मात्र, दाखल अर्जांची संख्या पाहता ती होण्याची शक्यता मावळली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. असे असले तरी, काही मोजक्या जागांवर ती बिनविरोध होईल, अशी शक्यता आहे. बहुतांश प्रभागात थेट तर काही जागांवर तिरंगी लढती होतील, असे अभ्यासकांनी दैनिक पुढारी प्रतिनिधीला सांगितले. आज सोमवारी अखेरच्या दिवशी दाखल झालेल्या अर्ज संख्येवरून कोण कोण माघार घेणार, कोण अखेरपर्यंत ठाम राहून मतदारांसमोर जाणार याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हे आजच्या परिस्थितीतील प्राथमिक चित्र असले, तरी अर्ज माघारीच्या (दि.25) दिवसांतीच खऱ्या लढतीचे एकंदरीत चित्र स्पष्ट होईल.
नगराध्यक्षपदासाठीच्या राजकीय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीच्या उमेदवारी समोर चार उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता नगराध्यक्ष सीट हे युतीचे लक्ष्य झाले आहे. युती पुरस्कृत भाजपचे संतोष दाभाडे असून, अपक्ष म्हणून माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, काँग्रेस पक्षाच्या माजी नगराध्यक्ष रंजना भोसले आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल सतीश वाळुंज आणि अपक्ष सौरभ दाभाडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
ही निवडणूक सहजासहजी बिनविरोध करण्याचे मनसुबे रचलेल्यांना मात्र दाखल अर्जाच्या संख्येने प्लान- बी करावा लागणार, की त्यांचा प्लान- ए कामी येणार, हे येत्या 25 तारखेस समोर येईल. त्यानंतरची निवडणुकीतील रणनीती आणि समीकरणे ठरली जातील. ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे आजचे चित्र दिसत आहे.
आज होणार छाननी; प्रभाग 9 व 13 मध्ये सर्वांधिक अर्ज
वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण 7 उमेदवारी अर्ज तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी एकूण 82 उमेदवारी अर्ज असे एकूण तब्बल 89 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते व सहायक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. रविवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी 19 अर्ज दाखल झाले होते. आज नगराध्यक्ष पदासाठी 5 व नगरसेवक पदासाठी 65 असे एकूण 70 अर्ज दाखल झाले. त्यामुळे आजअखेर नगराध्यक्ष पदासाठी 7 तर नगरसेवक पदासाठी 82 अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार मृणाल गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे, अपक्ष उमेदवार सायली रुपेश म्हाळसकर, वैशाली पवन उदागे, नाजमाबी अल्ताफ शेख यांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग 9 व 13 मध्ये प्रत्येकी 8 अर्ज आले असल्याने या दोन्ही प्रभागांत सर्वांत जास्त अर्ज आहेत. तर, प्रभाग 10 मध्ये फक्त दोन उमेदवारी अर्ज आले आहेत.
दरम्यान, दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी (दि. 18) होणार असून, अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारपर्यंत (दि. 21) अखेरची मुदत आहे. त्यामुळे दाखल झालेल्या अर्जांपैकी किती अर्ज वैध ठरतात व प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतात? हे छाननी प्रक्रिया व माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच स्पष्ट होईल.
निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते, सहायक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नगरपंचायतच्या वतीने शहरातील गर्दीचे ठिकाणे महाविद्यालय येथे मतदानाचे महत्त्व पटवून मतदार प्रतिज्ञा घेऊन मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये एलईडी स्क्रीन व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
प्रभाग 1 मध्ये 4, प्रभाग 2 मध्ये 6, प्रभाग 3 मध्ये 7, प्रभाग 4 मध्ये 3, प्रभाग 5 मध्ये 6, प्रभाग 6 मध्ये 6, प्रभाग 7 मध्ये 6, प्रभाग 8 मध्ये 4, प्रभाग 9 मध्ये 8, प्रभाग 10 मध्ये 2, प्रभाग 11 मध्ये 5, प्रभाग 12 मध्ये 3, प्रभाग 13 मध्ये 8, प्रभाग 14 मध्ये 3, प्रभाग 15 मध्ये 3, प्रभाग 16 मध्ये 5 आणि प्रभाग 17 मध्ये 3 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.