

वडगाव मावळ: विधानसभा निवडणुकीत भाजपा नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वडगाव नगरपंचायतची नगराध्यक्ष पदाची व प्रभाग 16 मध्ये नगरसेवक पदाची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश माळसकर व माजी उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस सुनील शिंदे, तानाजी तोडकर व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. रुपेश म्हाळसकर यांनी यावेळी बोलताना मावळ विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या नेत्यांसोबत झालेली चर्चा व त्यांनी दिलेला शब्द याबाबत खुलासा केला.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना जाहीर पाठिंबा देऊन सक्रिय काम करा, आम्ही तुम्हाला वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मदत करू, असे भाजपा नेत्यांनी आश्वासन दिले होते.
दरम्यान, गेली दोन वर्षांपासून आम्ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत असून, भाजपाने त्यांनी दिलेल्या शब्दामुळे गेली वर्षभर आम्ही आणखी जोमात तयारी केली. वडगावकर नागरिकांनीही आम्हाला प्रतिसाद दिला. परंतु ज्यांनी शब्द दिला त्या भाजपा नेत्यांनी मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर कुठलाही प्रतिसाद दिला नाही, चर्चाही केली नाही. नगराध्यक्षपदच नव्हे तर प्रभाग 16 या आमच्या हक्काच्या प्रभागात सुद्धा आम्हाला संधी देण्याचा विचार केला नाही. त्यामुळे ही निवडणूक नगराध्यक्ष पद व प्रभाग क्रमांक 16 मधील नगरसेवक पदासाठी आम्ही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हाळसकर यांनी सांगितले.
भाजपात प्रवेश करण्याचीही तयारी होती, पण...!
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी केवळ पाठिंबा नाही तर, भाजपामध्ये पक्षप्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी आम्ही दर्शवली होती. परंतु, भाजपातील काही मंडळींनी जाणीवपूर्वक विरोध करून खो घालण्याचे काम केले असल्याचा आरोपही रुपेश म्हाळसकर यांनी यावेळी केला.