Geo Tagging Schools Maharashtra: पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व शाळांचे जिओ टॅगिंग पूर्ण
वर्षा कांबळे
पिंपरी : राज्यातील शाळांच्या कामकाजात एकसूत्रता आणण्यासाठी मोबाइल ॲपच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे राज्यातील शाळांची माहिती एका क्लिकवर मिळत असून, जिओ टॅगिंगच्या माध्यमातून शाळांवर वॉच ठेवला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांचे जिओ टॅगिंगचे काम पूर्ण झाले आहे.
राज्यातील ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असणाऱ्या अंगणवाडी, विविध माध्यमांच्या शाळांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांना छायाचित्रांसह संबंधित माहिती नोंदवणे बंधनकारक केले होते; तसेच संबंधित शाळांनी भरलेल्या माहितीची खातरजमा करण्याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
..अशी मिळणार माहिती
शासनाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी ममहा स्कूल जीआयएसफ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये शाळांना त्यांचा मयू-डायस कोडफ किंवा मयु-डायस प्लसफमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करायचे आहे. त्यानंतर शाळेची यू-डायस प्लसमध्ये भरलेली माहिती या ॲपमध्ये दिसणार आहे. त्यानंतर शाळेचे ‘जीआयएस’मध्ये लोकेशनवरून शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण पाच फोटो समाविष्ट करुन संबधित शाळेने माहिती भरली आहे. ही माहिती एका क्लिकवर दिसणार आहे.
..असा होणार माहितीचा वापर
राज्यातील सर्व शाळांबाबतची संपूर्ण माहिती केंद्र शासनाच्या यू- डायस प्लस या पोर्टलवर उपलब्ध केली आहे. विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा आदी शाळांबाबतच्या विविध माहितीचा यात समावेश आहे. शासनस्तरावर विविध धोरण, कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना या माहितीचा वापर केला जाणार आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेसोबत करार करून माहिती गोळा करण्याचे काम देण्यात आले आहे.
शहरातील शाळांचे जिओ टॅगिंगचे काम पूर्ण
शिक्षण विभागाच्या माहितीचे एकत्रीकरण
विविध विभागांची माहिती, यू-डायस प्लस या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागांच्या माहितीचे एकत्रीकरण केले जाईल. स्वतंत्र डॅशबोर्ड यासाठी तयार केले जाईल. तसेच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेतर्फे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करण्यात येईल. गोळा केलेली माहिती मोबाईल ॲप महास्कूल जीआयएसवरून उपलब्ध होणार आहे.
शहरातील शाळांचे काही जिओ टॅगिंगचे काम अपूर्ण होते. आता सर्व शाळांचे काम पूर्ण झाले आहे. शाळांनी मान्यता घेताना दिलेली माहिती आणि ॲपमध्ये भरलेली माहिती यांची पडताळणी होवून त्यामध्ये तफावत आहे का हे कळेल.
संगीता बांगर प्रशासन अधिकारी, मनपा, पिं. चिं. मनपा

