

पिंपरी : हिंजवडी परिसरातील अवजड वाहनांच्या अपघातात पुन्हा एकदा एका निरपराध तरुणीला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी (दि. 17) दुपारी सव्वाएकच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे येथे झालेल्या अपघातात 20 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार तिच्या वडिलांच्या डोळ्यासमोर घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर संबंधित डंपरचालक वाहनासह पसार झाला आहे.
तन्वी सिद्धेश्वर साखरे (20, रा. मुक्तानंद हाइट्स, हिंजवडी- डांगे चौक रोड) ही वडील सिद्धेश्वर लक्ष्मण साखरे (45) यांच्यासोबत दुचाकीवरून सावंत पार्क चौकातून जात असताना हा अपघात झाला. डंपरची अचानक धडक बसताच दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि तन्वी थेट डंपरच्या चाकाखाली आली. जागीच मृत्यू झालेल्या तन्वीच्या वडिलांना किरकोळ दुखापत झाली असून, डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे.
हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिकाच सुरू असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या संदर्भात स्थानिकांनी मोर्चा काढून वाहतूक विभागाचे लक्ष वेधले होते. पोलिसांनीदेखील अपघात रोखण्यासाठी थेट गुन्हे दाखल करण्यात सुरुवात केली आहे. मात्र, तरीदेखील अपघात कमी होत नसल्याने आणखी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. दरम्यान, परवानगी असलेल्या वेळातही अवजड वाहनचालक भरधाव वेगात वाहने चालवतात. मागील दहा महिन्यांत या वाहनांनी पाच महिलांचे बळी घेतले आहेत.
1) 24 जानेवारी : हिंजवडी-माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ भरधाव रेडिमिक्स डंपर अचानक पलटी झाला. त्याच वेळी दुचाकीवर असलेल्या विद्यार्थिनी प्रांजली यादव (22) आणि अलेषा गावंडे (22) डंपरखाली चिरडल्या गेल्या.
2) 12 ऑगस्ट : हिंजवडी फेज दोन येथे इन्फोसिस कंपनीसमोर बंदीच्या वेळेत येणाऱ्या मिक्सरची धडक बसून प्रत्युषा बोराटे (वय 11) या चिमुरडीचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर परिसरात तीव्र आंदोलन झाले होते.
3) 10 ऑक्टोबर : माण रस्त्यावरील पांडवनगर येथे भरधाव सिमेंट मिक्सरची धडक बसून भारती राजेश मिश्रा (30, रा. थेरगाव) यांचा मृत्यू झाला.