लोणावळा: समाजकारण व जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असलेल्या राजकारणामध्ये दिवसेंदिवस मोठा बदल होताना दिसत आहे. असाच एक बदल सध्या मावळ तालुक्यामध्ये प्रामुख्याने समोर येऊ लागला आहे, तो म्हणजे पैठणीच्या खेळामधून उमेदवारी घोषित करण्याचा. मागील काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या उमेदवारांच्या उमेदवाऱ्या या पैठणीच्या खेळामधून जाहीर होऊ लागल्या आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत करणारा, विधानसभा, लोकसभा या मोठ्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी राबराब राबणारा कार्यकर्त्याला स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देण्याच्या निवडणुका म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ओळख आहे.
कोअर कमिटी नावालाच
पूर्वी या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून कोअर कमिटी तयार केली जात होती. ती कोअर कमिटी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची माहिती घेत त्यांचे अर्ज स्वीकारत त्यांच्या मुलाखती घेत असे. तसेच, मतदारसंघामध्ये करत असलेले काम, पक्षासाठी त्यांचे असलेले योगदान व समाजामध्ये त्यांची असलेली प्रतिमा या सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करत कमिटी उमेदवारांची नावे तयार करत असे. पक्षश्रेष्ठीकडून त्यांची उमेदवारी जाहीर केली जात असत.
निवडणुकीमध्ये अशा तळागाळातील कार्यकर्त्याला पक्षदेखील ताकद देत असे व त्यातूनच पुढे नेते घडत होते. आतादेखील अशा कोअर कमिट्या तयार केल्या जातात. मात्र, या कोअर कमिटीच्या माध्यमातून उमेदवारांची नावे पुढे न येता ती नावे मोठमोठ्या टोलेजंग कार्यक्रमांमधून जाहीर होऊ लागली आहेत. त्यामुळे कोणाला उमेदवारी हवी असेल तर त्यांनी काही लाख रुपये खर्च करून मोठे कार्यक्रम घ्यावेत व आपली उमेदवारी निश्चित करावी, असेदेखील उपरोधाने म्हणावे लागत आहे.
आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेला कार्यकर्ता उपेक्षित
मागील काही दिवसांमध्ये मावळ तालुक्यामध्ये काही उमेदवारी जाहीर झाले आहेत. मग ते जिल्हा परिषदेचे असो, पंचायत समितीचे असो किंवा नगर परिषदांचे असो. या निवडणुकांमधील उमेदवारांच्या घोषणा या टोलेजंग अशा कार्यक्रमांमधून, पैठणीच्या कार्यक्रमांमधून होऊ लागल्या आहेत. त्यामुळे मावळ तालुक्यामध्ये उमेदवारी घोषित करण्याचा नवा पॅटर्न उदयाला आला असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. जर उमेदवारी या टोलेजंग कार्यक्रमामधूनच जाहीर होणार असेल तर पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा, पक्ष वाढीसाठी राबणारा, जनतेमध्ये जाऊन काम करणाऱ्या पण आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या इच्छुकांनी उमेदवारी कशी मिळवायची? असादेखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.