

पिंपरी: सेवानिवृत्त व्यक्तीला व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट आणि मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून लाखोंची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना २३ जुलै ते २९ सप्टेंबर पर्यंत व्हॉट्सअॅपवरून ऑनलाइन पद्धतीने सांगवी येथे घडली.
याप्रकरणी नथुराम यशवंत भोळे (७१, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन व्हाट्स अप क्रमांक धारक आणि दोन बँक खाते धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या व्हॉट्स अॅप नंबरवर आरोपींनी व्हिडिओ कॉल केला. त्यावरून फिर्यादीला सांगितले की, त्यांच्या नावावरील मोबाईल नंबर चाईल्ड पॉर्नोग्राफीमध्ये वापरला गेला आहे.
सायबर क्राईम विभागाने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून कॅनरा बँकेचे एटीएम कार्ड नरेश गोयल यांच्या घरातून जप्त केले आहे. फिर्यादीने मनी लॉन्ड्रिंगसाठी खाते वापरण्यास देऊन २५ लाख रुपये कमिशन घेतले आहे, असे आरोपींनी सांगितले. फिर्यादीला सीबीआय विभाग आणि कोर्टासमोर ऑनलाइन व्हॉट्स अॅप व्हिडिओ कॉलवरून हजर करून त्यांना २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत डिजिटल अरेस्ट करण्याचे कोटनि आदेश दिले आहेत. तशा ऑर्डर व्हॉट्स अॅपवर पाठवल्या.
गुन्ह्याच्या तपासासाठी फिर्यादीच्या खात्यातील पैसे कोर्टाने दिलेल्या खात्यात अनुक्रमे १५ लाख ५० हजार रुपये आणि ७लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितल्यावर फिर्यादीने ते ट्रान्सफर केले. यानंतर आरोपींनी पुन्हा व्हिडिओ कॉल करणे बंद केले, तेव्हा फिर्यादीला फसवणूक झाल्याचा संशय आला. याबाबत सांगवी पोलिस तपास करत आहेत.