

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी (दि.11) काढण्यात येणार आहे. महापालिकेच्या नगरसेवकपदाच्या एकूण 128 जागांपैकी 92 जागा या आरक्षित आहे. त्यापैकी निम्म्या 64 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. जागा सुटते, की महिलांचे आरक्षण पडते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यावर अनेक इच्छुकांचे निवडणुकीचे समीकरण ठरणार आहेत. काहींचा पत्ता गुल होणार, तर काहींना लॉटरी लागणार आहे. निवडणुकीचे भवितव्य ठरविणाऱ्या या सोडतीमुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.(Latest Pimpri chinchwad News)
आरक्षण सोडत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मंगळवारी सकाळी अकराला सुरू होणार आहे. काचेच्या ड्रममध्ये चिठ्ठ्या टाकून त्या महापालिका केशवनगर शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत एक एक करून काढल्या जातील. काढलेली चिठ्ठीचा क्रमांक सर्वांना दाखवून वाचला जाईल.
प्रथम अनुसूचित जाती (एससी)च्या 20 पैकी 10 जागांवर महिलांच्या चिठ्ठ्या काढण्यात येतील. त्यानंतर अनुसूचित जमाती (एसटी)च्या तीन राखीव जागांपैकी दोन जागांसाठी महिलांच्या चिठ्ठ्या काढण्यात येतील. पुढे नागरिकांचा इतर मागास वर्ग (ओबीसी) साठी राखीव असलेल्या 34 जागांची सोडत काढण्यात येतील. त्यात महिलांच्या 17 चिठ्ठ्या काढण्यात येतील. शेवटी, सर्वसाधारण खुल्या (ओपन) गटातील 70 पैकी महिलांसाठी 35 जागांच्या चिठ्ठ्या काढल्या जातील. ही प्रक्रिया दुपारी एकपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
एकूण 128 पैकी 64 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. कोणत्या प्रभागात महिला आरक्षण पडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यावरून अनेक इच्छुकांचे भवितव्य ठरणार आहे. प्रभागातील जागा महिला राखीव झाल्यास अनेकांना लढता येणार नाही. परिणामी, त्यांचे राजकीय करिअर संपण्याचा धोका आहे. काहींचा पत्ता कट होईल. तर, काहींना आपसुक सोईस्कर जागा मिळून, विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. अपेक्षित जागा न सुटल्यास कुटुंबांतील पर्यायी महिला उमेदवारांचा पुढे करावे लागेल किंवा निवडणूक रिंगणात माघार घेण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे अनेकांनी अक्षरश: देव पाण्यात ठेवले आहेत. आपल्या प्रभागात महिला आरक्षण पडू नये, असे काही इच्छुकांची साकडे घातले आहे.
एकूण लोकसंख्या-17 लाख 27 हजार 692
एससी लोकसंख्या- 2 लाख 73 हजार 820
एसटी लोकसंख्या-36 हजार 535
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शासकीय व महापालिका वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी खासगी वाहने आणू नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
एससीच्या 20, एसटीच्या 3 जागेनंतर ओबीसीसाठी 34 जागा राखीव आहेत. खुल्या सर्वसाधारण गटातील 35 जागांवर महिलांचे आरक्षण पडणार आहे. प्रभागातील अ, ब, क आणि ड या चार जागा कोणाला सुटणार, एकूण 128 पैकी महिलांसाठी कोणत्या प्रभागातील जागा सुटणार, याबाबत इच्छुकांचे लक्ष लागले आहे. खुल्या गटातील जागेवर पुरुषांसोबत महिलांनाही लढता येते. सोडतीनंतर सर्व 32 प्रभागांतील जागांचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
एससी प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 19, 13, 30,25, 23, 20, 9, 11, 16, 21, 10, 32, 29, 27, 31, 26, 8, 4, 17 आणि 3 हे एकूण 20 प्रभागात आरक्षण असण्याची शक्यता आहेत. एससी लोकसंख्येनुसार या प्रभागातील एका जागेवर महिला किंवा पुरुष एससी प्रवर्गाचे आरक्षण पडू शकेल. या 20 पैकी 10 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. प्रभाग क्रमांक 4, 29 आणि 30 या तीन प्रभागांत एसटी प्रवर्गाचे आरक्षण पडण्याची शक्यता आहे. त्यातील दोन जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. या प्रवर्गात पुरुषासाठी केवळ एक जागा राखीव असणार आहे.
आरक्षण सोडतीसाठी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिकेच्या निवडणूक विभागाने संपूर्ण तयारी केली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. डॉ. पुलकुंडवार यांनी आरक्षण सोडतीच्या तयारीची संपूर्ण माहिती घेतली. तसेच, आरक्षण सोडतीच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या वेळी पोलिस प्रशासन व महापालिकेच्या सुरक्षा विभागाने प्रा. रामकृष्ण प्रेक्षागृह व परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतला.
आरक्षण सोडतीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने सोमवारी (दि.10) पुणे विभागीय अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली रंगीत तालीम पार पडली. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे, पोलिस निरीक्षक अंकुश बांगर, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांच्यासह सहआयुक्त मनोज लोणकर, नगर सचिव मुकेश कोळप, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक व कर्मचारी उपस्थित होते.