वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी हिवाळी अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी व 2 तलाठी अशा दहा जणांवर केलेली निलंबनाची कारवाई आज रद्द करण्यात आल्याचा आदेश महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे संबंधित दहाजण ते कार्यरत असलेल्या ठिकाणी पुन्हा रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंगरूळ गावच्या हद्दीतील अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी आमदार सुनील शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी थेट मावळचे विद्यमान तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह यापूर्वी तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे मधुसूदन बर्गे, रणजीत देसाई, जोगेंद्र कट्यारे तसेच मंडल अधिकारी संदीप बोरकर, माणिक साबळे, रमेश कदम, अजय सोनवणे व तलाठी दीपाली सलगर, गजानन सोनपट्टीवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करत असल्याचे जाहीर केले होते.
महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी केले होते आंदोलन
दरम्यान, महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर एकाच वेळी अशा प्रकारे झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण राज्यभरातील महसूल विभागात खळबळ उडाली होती. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेऊन निलंबनाची कारवाई मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला होता.
यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी तीन दिवसांत याबाबत विभागीय आयुक्तांनी अहवाला द्यावा, मी कारवाई मागे घेतो असे आश्वासन दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त चंद्रशेखर पुलकुंडवार यांनी अहवाल सादर केल्यानंतर विभागीय चौकशी करण्याच्या अधिनतेने महसूल मंत्र्यांनी केलेली निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
तसेच, तहसीलदार विक्रम देशमुख यांना मावळ तहसीलदार, मधुसूदन बर्गे यांना उप जिल्हाधिकारी, भूसंपादन, नागपूर, रणजीत देसाई यांना उप जिल्हाधिकारी, पालघर या पदांवर पूर्ववत करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.