Wanted Accused Search Operation Pudhari
पिंपरी चिंचवड

Wanted Accused Search Operation: फरार ‘वॉन्टेड’ आरोपी पोलिसांच्या रडारवर; महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष शोधमोहीम

प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र पथक; पिंपरी-चिंचवडमधील एनडीपीएसचे ७३ आरोपी रडारवर

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना गुंगारा देत फरार असलेले ‘वॉन्टेड’ आरोपी आता राज्यभरातील पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष शोधमोहीम हाती घेतली असून, प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र पथक कार्यरत करण्यात आले आहे.

या मोहिमेत मागील दहा वर्षांतील ‘फरार’ आणि ‘पाहिजे’ आरोपींच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत. आरोपी किती काळापासून फरार आहे, त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे, यानुसार वर्गवारी करून शोध घेतला जाणार आहे. स्थानिक हद्दीत आरोपी न सापडल्यास शेजारील पोलिस ठाणे, जिल्हा, परिक्षेत्र आणि त्यानंतर राज्याबाहेरही त्याचा माग काढला जाणार आहे.

अपर पोलिस महासंचालक कार्यालयाच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयानेही मोहिमेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात एक पोलिस उपनिरीक्षक अथवा सहायक पोलिस निरीक्षक आणि दोन ते तीन कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांना पूर्णवेळ फरार व पाहिजे आरोपींच्या शोधाचे काम देण्यात येणार असून अन्य कर्तव्ये दिली जाणार नाहीत.

टप्प्याटप्प्याने आवळणार फास

शोधमोहिमेसाठी टप्पेनिहाय नियोजन करण्यात आले आहे. प्रथम स्वतःच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरोपींचा शोध घेतला जाईल. त्यानंतर शेजारील ठाण्यांची हद्द, जिल्ह्यातील अन्य ठाणी, जिल्हा अथवा परिक्षेत्राबाहेर आणि शेवटच्या टप्प्यात राज्याबाहेरील आरोपींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यामुळे गुन्ह्यानंतर मूळ गावी किंवा परराज्यात आश्रय घेऊन पोलिसांना चकवा देणाऱ्यांवरही कारवाईचा फास आवळला जाणार आहे.

रोजच्या कामगिरीवर वरिष्ठांची नजर

विशेष पथकांच्या कामावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण राहणार आहे. पथकांच्या पर्यवेक्षणासाठी पोलिस उपअधीक्षक अथवा सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रलंबित प्रकरणे, तपासलेले आरोपी आणि हाती लागलेल्या आरोपींचा दररोज आढावा घेतला जाणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील चारही परिमंडळांसाठी नोडल अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून, पोलिस ठाण्यांना आरोपींच्या याद्या अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘एनडीपीएस’च्या ७३ आरोपींचा विशेष माग

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांतील ७३ आरोपी वॉन्टेड आहेत. राज्यभरातील फरार आरोपींविरोधात सुरू झालेल्या विशेष मोहिमेत या आरोपींचा प्राधान्याने माग काढला जाणार आहे. अमली पदार्थांची विक्री आणि तस्करीची साखळी मोडण्यासाठी त्यांच्या संभाव्य ठिकाणांची माहिती संकलित करून शोध घेतला जाणार आहे. तसेच, स्टँडिंग वॉरंट, फरारी उद्घोषणा आणि आवश्यकतेनुसार मालमत्ता जप्तीची न्यायालयीन प्रक्रियाही राबविली जात आहे.

अपर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त सूचनांनुसार फरार आणि पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मोहिमेच्या कामगिरीचा नियमित आढावाही घेतला जाणार आहे.
रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT