

पिंपळे गुरव: सुदर्शननगर आणि महाराष्ट्र कॉलनी परिसरातील पदपथ सध्या पादचाऱ्यांसाठी अडथळ्यांचा मार्ग बनला आहे. पदपथावर उभी केली जाणारी वाहने, चहा-पान टपऱ्यांचे कचरापेटीचे बॉक्स तसेच तेथे बसणाऱ्या तरुणांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पदपथावर लावलेल्या वाहनांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोका संभवतो, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या परिसरातील रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी असलेला पदपथ मोकळा असणे अपेक्षित आहे. मात्र, पदपथावरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने चालण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. परिणामी नागरिकांना वाहतुकीच्या रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे.
कचरापेट्यांनीही पदपथ व्यापला
परिसरातील चहा व पान टपऱ्यांचे कचरापेटीचे बॉक्सही पदपथावरच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांबरोबरच कचरापेट्यांमुळेही पादचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली जागा कमी झाली आहे. पदपथ चालण्यासाठी आहेत की पार्किंग आणि चहा-सिगारेटच्या ठिय्यासाठी?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेने कारवाई करण्याची मागणी
पदपथावरील वाहने हटविणे, बाकडे हटवणे, कचरापेट्या व इतर अडथळे बाजूला करणे तसेच पदपथाचा वापर अडविणाऱ्या टपऱ्यांबाबत आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे आहे. संबंधित प्रशासनाने केवळ पाहणी न करता पदपथ पादचाऱ्यांसाठी पूर्णपणे मोकळा व सुरक्षित करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
वाहनांवर बसून चहा-सिगारेटचा ठिय्या
पदपथावर वाहने लावून बाकडे ठेवून काही तरुण त्यावर बसून चहा घेत सिगारेट ओढत असल्याचे चित्रही दिसून येते. या ठिकाणी तरुणांचा ठिय्या असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
'८ टू ८० गार्डन'कडे जाणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय
या मार्गावर पुढे '८ टू ८० गार्डन' असल्याने सकाळी आणि संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुले मोठ्या संख्येने ये-जा करतात. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकही या पदपथाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र, पदपथ अडवल्यामुळे त्यांनाही वाहतुकीच्या रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे. महाराष्ट्र कॉलनी परिसरातील नागरिकांनाही या प्रकाराचा मोठ्या प्रमाणावर त्रास जाणवत आहे. पदपथावर अडथळे निर्माण झाल्याने रोजच्या ये-जा करताना नागरिकांची कसरत होत आहे.
पदपथ, रस्त्यावर अतिक्रमण
सुदर्शन नगर येथील बटूराव जगताप उद्यानासमोरील पदपथावर साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. जगताप पेट्रोल पंप रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने तातडीने पाहणी करून पदपथ व रस्ता अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुळातच रस्ता अरुंद आहे. त्यात दुकानांचे साहित्य आणि व्यवसाय पदपथावर मांडल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते आणि अपघाताचा धोका वाढतो. व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय दुकानाच्या हद्दीतच करावा आणि पदपथ नागरिकांसाठी मोकळा ठेवावा.
दीपक जवळकर, सामाजिक कार्यकर्ते
चहावाले, पानटपरीवाले किंवा इतर व्यावसायिकांनी फ्लेक्स, कचरा पेट्या किंवा इतर साहित्य पदपथावर ठेवले असल्यास, तात्काळ बीट निरीक्षकांना सूचना देऊन पथक पाठवण्यात येईल. हे साहित्य हटवून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
राजू कांबळे, कार्यालयीन अधीक्षक, ड क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी, पिंपरी-चिंचवड मनपा