लोणावळा: एकीकडे मावळ तालुक्यात ‘जलजीवन मिशन’ माध्यमातून घरोघरी पाणी पोहोचविण्याचे काम केले जात असताना, दुसरीकडे लोणावळ्यासारख्या जागतिक पर्यटननगरीच्या अगदी जवळ असलेल्या फणसराई वस्तीवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचा कडाका वाढताच येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लोणावळा शहरापासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आणि प्रसिद्ध मफडेला ॲडव्हेंचरफफ या पंचतारांकित पर्यटन स्थळापासून हाकेच्या अंतरावर फणसराई ही वस्ती आहे. या ठिकाणी प्रामुख्याने 18 ते 20 धनगर आणि कातकरी कुटुंबे (100 लोकसंख्या) वास्तव्यास आहेत. राजमाची किल्ल्याच्या वाटेवर असलेल्या या वस्तीत एका सामाजिक संस्थेने खोदलेल्या विहिरीमुळे 8 ते 10 महिने पाण्याची सोय होते.
मात्र, मार्च महिना संपताच या विहिरीने तळ गाठला असून, आता नागरिकांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. विहीर आटल्यामुळे येथील महिला आणि पुरुषांना डोंगराच्या पलीकडे असलेल्या धरणावरून पाणी आणावे लागते. हातावर पोट असलेल्या या कष्टकरी समाजाला रोजची मजुरी सोडून पाण्यासाठी तासनतास खर्च करावे लागत आहेत. डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन डोंगरदऱ्यातून चालणे हे अत्यंत जिकिरीचे आणि कष्टाचे काम येथील नागरिक दरवर्षी उन्हाळ्यात सोसत आहेत.
आमदारांचे आमच्याकडे दुर्लक्ष का?
एकीकडे मावळ तालुका विकासाच्या बाबतीत आघाडीवर आहे. लोणावळा शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे असताना या शहराच्या लगत असलेल्या वाड्यावर त्या आजही वेगवेगळ्या समस्यांसाठी झगडत आहेत. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचला आहे. वेगवेगळ्या वाड्यावर रस्ते तसेच लाईटची सुविधा त्यांनी उपलब्ध केलेली असताना फणसराईसारख्या दुर्गम वस्तीकडे दुर्लक्ष का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. मावळचे आमदार शेळके यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन या वस्तीवर पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
खासगी टँकरचालकांनीही फिरवली पाठ
फणसराईकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्याने शासकीय किंवा खासगी टँकरचालक या भागात येण्यास कचरतात. जे टँकर येण्यास तयार होतात, ते खराब रस्त्याचे कारण सांगून दुप्पट दराने पैसे घेतात असे येथील नागरिक सांगतात. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांना इतक्या महागड्या दराने पाणी विकत घेणे परवडणारे नाही. त्यामुळे टँकरची सुविधा असूनही ती येथील लोकांसाठी मृगजळ ठरत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते तसेच संस्थांच्या माध्यमातून टँकर उपलब्ध झाले तरी ते पाणी क्षणिक आहे.
मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित
लोणावळ्यात पर्यटनासाठी येणारे लोक कोट्यवधी रुपये खर्च करतात, पण त्याच लोणावळ्याच्या कडेला असलेल्या आमच्या वस्तीला प्यायला पाणी नाही, लाईटची सोय नाही, चालण्यासाठी रस्ते नाहीत, आरोग्याची कोणती सुविधा नाही, शिक्षणाची सोय उपलब्ध नाही, प्रशासनाने आणि सामाजिक संस्थांनी आमचा हा वनवास थांबवावा, अशी मागणी फणसराई येथील स्थानिक नागरिक करत आहेत.