

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरणपूरक (ग््राीन बिल्डिंग) इमारत, हाऊसिंग सोसायटी, बंगले, घरांना मालमत्ताकरातील सामान्यकरावर विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि झिरो वेस्ट संकल्पना प्रभावीपणे राबवणाऱ्या इमारतींना मालमत्ताकरात थेट सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संगोपन करताना नागरिकांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे. त्यामुळे हाऊसिंग सोसायटी आणि व्यावसायिक इमारतींना कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी पुनर्वापर करण्यास सोसायटीना प्रेरणा मिळणार आहे. नागरिकांनी या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा उभाराव्यात. पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या कर संकलन विभागाने केला आहे.
पर्यावरणपूरक उपाययोजना राबवणाऱ्या इमारतींना प्रोत्साहन देणे हा या सवलती मागील मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी ऑनसाइट कंपोस्टिंग, मैलासांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झिरो वेस्ट संकल्पना स्वीकारल्यास शहरातील कचरा व्यवस्थापनास आणखी बळ मिळेल, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
ग््राीन सिटी संकल्पास बळकटी मिळणार
पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. कर सवलतींच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्यास प्रोत्साहन मिळेल आणि ग््राीन सिटीचा संकल्प अधिक बळकट होईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
अशा आहे सामान्यकरात सवलत
ऑनसाइट कंपोस्टिंग यंत्रणा कार्यान्वित असल्यास 5 टक्के सवलत
ऑनसाइट कंपोस्टिंग एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास 8 टक्के सवलत
फक्त एसटीपी प्लँट कार्यान्वित असल्यास 3 टक्के सवलत
झीरो वेस्ट संकल्पना राबविल्यास 8 टक्के सवलत
झीरो वेस्ट तसेच एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास 10 टक्के सवलत