लोणावळा: लोणावळा शहरातील तुंगार्ली प्रिच्छली हिल भागातून जाणाऱ्या मोठ्या ओढ्याच्या पात्रात अतिक्रमण करून ते गिळंकृत करण्याचा प्रयत्न नगर परिषदेने उधळून लावला. एलिको बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडून ओढ्यात पाईल फुटिंगचे काम सुरू करण्यात आले होते.
याप्रकरणी लोणावळा नगर परिषदेने कडक भूमिका घेत संबंधित बांधकाम व्यावसायिकाला काम थांबविण्याचे आणि ओढा पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. तुंगार्ली धरणापासून खंडाळ्यापर्यंत पाणी वाहून नेणारा एक महत्त्वाचा मोठा ओढा आहे. तुंगार्ली, गोल्ड व्हॅली आणि प्रिच्छली हिल भागातील पावसाचे पाणी याच मार्गाने वाहते.
मात्र, एलिको बिल्डर्सकडून या ओढ्याच्या पात्रात संरक्षण भिंत बांधण्यासाठी पाईल फुटिंग घेण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे ओढ्याचे नैसर्गिक पात्र निम्म्याने कमी होऊन पावसाळ्यात शेजारील सोसायट्यांना, विशेषतः प्रीतीनगर सोसायटीच्या सुरक्षा भिंतीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
13 वर्षांनंतर पुन्हा तोच प्रयत्न
विशेष म्हणजे, 2013 साली देखील याच बिल्डरने या ओढ्यात बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही नगरपरिषदेने त्यांना नोटीस बजावून 15 मीटरची मर्यादा पाळण्याचे आदेश दिले होते. तब्बल 13 वर्षे हे काम बंद होते. मात्र, आता पुन्हा एकदा शासनाची दिशाभूल करत हे अतिक्रमण सुरू करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
हरित लवादाकडे धाव घेण्याचा पवित्रा
नगर परिषदेने नोटीस देऊन 15 दिवस उलटले तरी अद्याप पाईल फुटिंगच्या लोखंडी सळ्या आणि इतर साहित्य ओढ्यातच पडून आहे. नगर परिषदेने केवळ नोटीस न देता कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही राष्ट्रीय हरित लवादाकडे न्याय मागू, असा इशारा प्रीतीनगर सोसायटीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिला
आमदारांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाला जाग
प्रीतीनगर सोसायटीच्या सदस्यांनी या अनधिकृत बांधकामाविरोधात आवाज उठवला. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि नगर परिषदेला तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. आमदारांच्या या सूचनेनंतर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित स्थळाची पाहणी करत अतिक्रमण झाले असल्याचे नमूद करत काम थांबवले आहे. आमदारांच्या या तत्परतेबद्दल सोसायटीधारकांनी त्यांचे आभार मानले.
नगर परिषदेची नोटीस अन् इशारा
24 एप्रिल 2026 रोजी नगररचना विभाग आणि बीट अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. यामध्ये ओढ्याच्या पात्रात नियमांचे उल्लंघन करून बांधकाम होत असल्याचे स्पष्ट झाले.
नियमानुसार, ओढा किंवा नाल्याच्या काठापासून 15 मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे.
नगर परिषदेने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, ओढ्यातील संरक्षण भिंतीचे काम तात्काळ थांबवावे.
जागा मूळ स्वरूपात (पूर्ववत) करण्यात यावी.
आदेशाचे उल्लंघन केल्यास बांधकामाची परवानगी रद्द करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.