Kudalwadi Road Dust Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Kudalwadi Road Dust Issue PCMC: कुदळवाडीत रस्त्याचे काम रखडले; धुळीने नागरिक हैराण

डांबरीकरणाअभावी उडणाऱ्या धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न; महापालिकेच्या दुर्लक्षावर स्थानिकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मागील वर्षी कुदळवाडी येथील अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यानंतर येथील डीपी रस्ते विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले; परंतु अद्याप येथील रस्ते पूर्ण न झाल्याने येथील नागरिकांना तसेच वाहनचालक व व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर डांबरीकरण न केल्याने मोठ्या प्रमाणावर धुळीचे सामाज्य पसरले आहे.

कुदळवाडी येथील मोरे पाटील चौक ते चिखली-मोशी मार्गाला जोडणारा रस्ता बालघरे वस्ती, विसावा चौकातून हा मार्ग जातो. या मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. यामुळे मागील एक वर्षापासून येथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी खडी टाकण्यात आलेली आहे. त्यावर त्यावर कुठे कच तर कुठे बारीक खडी टाकून रस्ता ठिकठिकाणी तयार केला आहे. परंतु रस्त्यावर डांबरीकरण न केल्याने चारचाकी, अवजड वाहने तसेच इतर मालवाहतूक करणारे वाहने या रस्त्याने गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. यामुळे आजूबाजूचे व्यावसायिक, रहिवासी तसेच पादचारी यांना धुळीचा सामना करावा लागत आहे.

या भागात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास आहे. यामुळे पादचारी नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यांना रस्त्याने प्रवास करताना धुळीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. बारीक धूळ व मातीचे कण नागरिकांच्या डोळ्यात जात असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांना डोळ्याच्या रुग्णालयात जाण्याची वेळ येत आहे. डोळे चेक करण्यासाठी साधारण 300 ते 500 रुपये फी देऊन नंतर ड्रॉप, गोळ्या घेण्याची वेळ येत आहे. तसेच त्या दिवशी कामाला दांडी पडत आहे. यामुळे येथील रस्त्याचा विकास नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.

रस्त्यावर पाणी मारण्याची गरज

रस्त्याचे काम करताना जोपर्यंत डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत रस्त्यातील धूळ उडून नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी संबंधित ठेकेदाराने घेणे गरजेचे आहे. मागील वर्षापासून रस्त्याचे काम सुरू आहे; परंतु अद्याप एकही दिवस धूळ उडू नये यासाठी ठेकेदार उपाययोजना करताना दिसून येत नाही. याकडे महापालिकेचा संबंधित विभाग देखील दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे महापालिका प्रदूषण व हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यावर पाणी मारण्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे दिवसरात्र कुदळवाडीतील नागरिक धुळीचा सामना करत आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

महापालिकेने शहराची हवा शुद्ध राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे. परंतु, कुदळवाडीत देखील नागरिक राहत आहेत. टॅक्स भरत आहेत. त्यांनादेखील शुद्ध हवेची गरज आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आम्हाला रस्त्याने प्रवास करणे देखील कठीण झाले आहे. घराची दारे, खिडक्या बंद करून बसण्याची वेळ आली आहे. धुळीने घरात राहत आहे की मातीत, अशी आमची अवस्था झाली आहे. तरी संबंधित रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे. डांबरीकरण होईपर्यंत धूळ उडणार नाही, याची व्यवस्था करावी.
स्थानिक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT