MCOCA Pudhari
पिंपरी चिंचवड

Kisan Tapkir Mokka: फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का

चऱ्होली खून प्रकरणातील मास्टरमाइंडसह चार गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: चऱ्होली खून प्रकरणात फरार असलेला आरोपी माजी नगरसेवक किसन तापकीरसह सहा जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका)अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

तापकीर टोळीसह चिखलीमधील अनिरुद्ध जाधव, एमआयडीसी भोसरीमधील राहुल लोहार, दिघीमधील विक्रांत देवकुळे या टोळ्यांवरदेखील मोकाची कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चालू वर्षात 35 गुन्हेगारी टोळ्यांमधील 179 गुन्हेगारांवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे.

आर्थिक वादातून नितीन गिलबिले या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली. तर सातवा साथीदार माजी नगरसेवक किसन ऊर्फ ज्ञानोबा तापकीर हा फरार आहे. तोच या गुन्ह्याचा मास्टर माईंड असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दिघी पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या सात जणांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यातील आरोपींवर सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख अमित जीवन पठारे (33, रा. चऱ्होली बुद्रुक), विक्रांत सुरेश ठाकूर (38, रा. सोळू, खेड), सुमित फुलचंद पटेल (31, रा. दिघी), आकाश सोमनाथ पाठारे (23, रा. चऱ्होली बुद्रुक), सोमनाथ प्रकाश पाटोळे (24, रा. सोळू, खेड), किसन ऊर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर (रा. चऱ्होली बुद्रुक) अशी कारवाई झालेल्या टोळीची नावे आहेत.

दिघी पोलिसांनी आणखी एका टोळीवर मोकाचा प्रस्ताव पाठवला आहे. टोळी प्रमुख विक्रांत ऊर्फ सरडा प्रकाश देवकुळे (24), सूरज राजू चव्हाण (20), साहिल उर्फ विश्वास मुकेश लोट (19), शुभम सुमित डिंगीया (24, सर्व रा. बोपखेल) या टोळीवर एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिघी पोलिसांनी मोकाचा पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून विक्रांत देवकुळे टोळीवरदेखील कारवाई झाली आहे.

चिखली परिसरातील सराईत गुन्हेगार अनिरुद्ध ऊर्फ बाळ्या ऊर्फ विकी राजू जाधव याच्या टोळीवर देखील मोका लावण्यात आला आहे. टोळी प्रमुख विकी जाधव याच्यासह सोहन राजू चंदेलिया (23, रा. रावेत), प्रद्युमन राजकुमार जवळगे (25, रा. चाकण), यश ऊर्फ गोंद्या आकाश खंडागळे (21, रा. निगडी), अभिषेक ऊर्फ बकासुर चिमाजी पवार (22, रा. चिंचवड), शुभम गोरखनाथ चव्हाण (30, रा. आकुर्डी), अनिकेत अशोक बाराथे (27, रा. दापोडी), अश्विन सुधीर गायकवाड (21, रा. दापोडी), यशपालसिंग अरविंद सिंग देवडा (19, रा. सांगवी) आणि पाच अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाई झाली आहे. या टोळीतील सदस्यांवर तब्बल 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

एमआयडीसी भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख राहुल अप्पासाहेब लोहार (27, रा. उरुळी कांचन), टोळीतील सदस्यहृतिक प्रकाश गायकवाड (24, रा. चाकण), आकाश दिनकर गायकवाड (24, रा. मोशी), गणेश बबन वहिले (23, रा. डुडुळगाव, पुणे), शिवतेज ज्ञानेश्वर ठाकरे (24, रा. डुडुळगाव) यांच्या विरोधात 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीवरदेखील मोकाची कारवाई करण्यात आली आहे. मोकाची कारवाई झालेल्या चार टोळ्यांमधील आरोपींवर चिखली, निगडी, शिरगाव, रावेत, चिंचवड, वाकड, देहूरोड, एमआयडीसी भोसरी, दिघी, हिंजवडी, दिघी, दापोडी, सांगवी, आळंदी, विश्रांतवाडी, खडकी, कोंढवा, उत्तमनगर पोलिस ठाण्यात खून, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगा करून तोडफोड करणे, गंभीर दुखापत, बेकायदा जमाव जमवून मारहाण करणे, अमली पदार्थ विक्री करणे, चोरी, अपहरण, शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT