

पिंपरी: औद्योगिकनगरी म्हणून नावारुपास आलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारांच्या आरोग्य समस्यांच्या निराकरणासाठी नवसंजीवनी मिळाली असून, दुर्धर आजारांवर उपचार मिळणे सुकर झाले आहे. मोहननगर येथील रुग्णालयांत दंतचिकित्सा आणि शस्त्रक्रिया विभागाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. याचा फायदा शहरातील कामगारांना व तसेच, त्यांच्या कुटुंबीयांना देखील होणार आहे. तसेच, नव्याने सुरू झालेल्या अतिदक्षता विभागाच्या माध्यमातून उत्तम सेवा मिळू शकणार आहे.
मोहननगर येथील ईएसआय रुग्णालयात कामारांना मोफत उपचार मिळतात. मात्र, अत्याधुनिक सुविधांचा अभाव असल्यामुळे गंभीर वा दुर्धर आजारांवर इतर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. दरम्यान, आता ईएसआय रुग्णालय सर्व सोयीसुविधांमध्ये अग्रेसर झाले आहे. तसेच, पाच महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागात वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण उपचार घेत आहेत. पुढील टप्प्यात शस्त्रक्रिया विभाग आणि दंतचिकित्सा विभागातही अत्याधुनिक उपकरणे बसवली जाणार आहे.
दरम्यान, या रुग्णालयात हायडेफिनेशन लेप्रोस्कोपी, आधुनिक ऑटोक्लेव्ह, तसेच नव्याने ॲनेस्थिशिया यंत्रणादेखील उपलब्ध केली जाणार आहे. शस्त्रक्रिया विभागात लॅमिनर एअरफलो, उच्च दर्जाचे एचव्हीसीपी आणि जंतुमुक्त वातावरणासाठी स्वतंत्र यंत्रणा बसवली जाणार आहे. तसेच, मॉनिटरींग सिस्टिम, आरामदायी बेड, क्रिटिकल केअरसाठी स्वतंत्र मनुष्यबळ असेल.
या सुविधा मिळणार
अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपकरणे
कॅन्सर, हृदयरोगावर होणार उपचार
अतिदक्षता विभागामुळे निदान लवकर
डिजिटल प्रणाली
वैद्यकीय तज्ज्ञ, प्रशिक्षित स्टाफ
हृदयरोग, किडनीवर उपचार
कामगार अनेकदा छोटे आजार अथवा दुखापतीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, त्याचे परिणाम अनेकदा या आजाराची गुंतागुंत वाढते. कधीकधी हृदयरोग, किडनी अथवा कॅन्सरसारखा आजार बळावतो; मात्र आता हा आजार वेळेत ओळखून त्यावर उपचार करणे आणखी सुलभ होणार आहे. ईएसआय रुग्णालयात हृदयविकार तज्ज्ञ , मूत्रविकार तज्ज्ञ आणि कर्करोग उपचार तज्ज्ञ उपलब्ध झाले आहेत.
ईएसआयमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार होत आहेत. तसेच, हृदयरोगाच्या विविध आजारांवर वेळेत उपचार होणे शक्य होत आहे. नव्याने दंतचिकित्सा आणि शस्त्रक्रिया विभागाचे नूतनीकरण होत असून, अतिदक्षता सेवेमुळे उपचारपद्धती आणि प्रगत सेवा मिळत आहे.
डॉ. वर्षा सुपे, चिकित्सा अधीक्षक, ईएसआय रुग्णालय