

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक पुढील महिन्यात जानेवारी 2026 ला होत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मतदान, मतमोजणी, स्ट्राँग रूम आदी ठिकाणी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी वाहने भाड्याने घेण्यात येत आहे. तसेच, संगणक, मंडप, स्टेशनरी व इतर साहित्यांसाठी तब्बल 40 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च करण्यात येणार आहे. आचारसंहितेपूर्वी कामांच्या निविदाप्रक्रिया पूर्ण करून वर्कऑर्डर देण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन तात्काळ कार्यवाही करीत आहे. फेबुवारी 2017 च्या निवडणुकीप्रमाणे एकूण 128 जागांसाठी चार सदस्यीय 1 ते 32 प्रभागरचना कायम ठेवण्यात आली आहे. त्यात तीन प्रभाग फोडल्याने एकूण सहा प्रभागात बदल झाले आहेत. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आरक्षणही अंतिम करण्यात आले आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी सोमवारी (दि.15) प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान व मतमोजणीसाठी मनुष्यबळ नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण 2 हजार 33 मतदान केंद्र व 11 निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय निश्चित करण्यात येत आहेत. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे ईव्हीएम मशिन ठेवण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. त्यापैकी काही साहित्य महापालिकेस प्राप्त झाले आहे.
निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच, मतदान केंद्र व मतमोजणी कक्ष येथे मंडप टाकणे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे उभारणे. प्रकाश व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, विद्युतविषयक कामे, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात वेब कॉस्ट करणे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी 355 पीएमपीएल बस, इनोव्हा, कार, कंटेनर, मिनी बस, रिक्षा व सुमो वाहने भाड्याने घेण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, त्यांचा भत्ता, मतदान व मतमोजणीच्या ठिकाणी जेवण, नाश्ता, कर्मचाऱ्यांची ने-आण करणे, स्टेशनरी तसेच, आवश्यक साहित्य खरेदी केले जाणार आहे. प्रभागनिहाय तसेच, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी छापली जाणार आहे. त्यासाठी स्थायी समितीची मान्यता घेऊन ठेकेदार नेमण्यात आले आहे. त्यांच्याकडून ती कामे वेळेत करून घेतली जात आहेत. तसेच, स्वीप कक्षाकडून मतदान जनजागृती मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.
असा आहे खर्च...
एका निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी मंडप टाकण्याचा खर्च 50 लाख इतका आहे. अशी शहरात अकरा कार्यालये उभारण्यात येणार आहेत. त्याचा एकूण खर्च 3 कोटी 50 लाखांच्या पुढे आहे. वाहने भाड्याने घेण्याचा खर्च तब्बल 5 कोटी 10 हजार तसेच मतदार यादीचे कंट्रोल चार्ट करण्यासाठी थेट पद्धतीने 6 लाख 49 हजार रुपये खर्च करून संगणक प्रणालीत खरेदी करण्यात आली आहे. मतदार जनजागृतीसाठी तब्बल 1 कोटी 3 लाख 50 हजार खर्च, विद्युतविषयक कामे करण्यासाठी 6 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मतदान केंद्रांवर बेवकास्टिंग करण्यासाठी 3 कोटी 82 लाख खर्च करण्यात येणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी 1 कोटी 91 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. तसेच, इतर कामांसाठी मोठा खर्च केला जाणार आहे. नागरिकांना ऑनलाईन वेब पोर्टलद्वारे नाव सर्च करण्याची सुविधेसाठी आणि सारथी हेल्पलाईनवर मतदार चौकशीसाठी 22 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.
15 हजार मनुष्यबळासाठी तब्बल दोन कोटींचा खर्च
शहराची मतदारसंख्या वाढली आहे. ती 17 लाख 13 हजार 891 झाल्याने मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 33 झाली आहे. मतदान तसेच, मतमोजणीसाठी महापालिका प्रशासनाला तब्बल 15 हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. महापालिका तसेच, महापालिका व खासगी शाळा, केंद्र व राज्य शासनाच्या संस्था व विभाग, राष्ट्रीयीकृत व खासगी बँका आदींकडून मनुष्यबळ घेण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पाठपुरावा केला जात आहे. त्यासाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात महापालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीसाठी नेमलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना 1 हजार 200 ते 1 हजार 800 रुपये भत्ता दिला जातो. मनुष्यबळ नियुक्त करण्यासाठी शहरातील सर्व विभाग तसेच, संस्थांशी संपर्क साधण्यात येत आहे.
विविध विभागांकडून कामकाज सुरु
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबवून कामांची तयारी केली जात आहे. संबंधित पुरवठादार व ठेकेदारांकडून कामे करून घेतली जात आहेत. विविध विभागांकडे निवडणुकीसंदर्भातील कामकाज सोपविण्यात आले आहे. त्या-त्या विभागांकडून कामकाज करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी 40 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च अपेक्षित आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.